अठरा वर्षांच्या राजेशने आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाच्या आत्महत्येने सारे घर हादरून गेले. त्याही परिस्थितीत आई-वडिलांनी राजेशचे डोळे दान करायचे ठरवले.. या अद्भुत नेत्रदानामुळे जे. जे. रुग्णालयात दोन मुलींना दृष्टी मिळाली. त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.. कोणते दान सर्वश्रेष्ठ हा वादाचा विषय असू शकतो हे मान्य केले तरी ‘नेत्रदान’ हे माझ्या लेखी सर्वश्रेष्ठ दान असल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते व विख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांचे म्हणणे आहे.
भारतात वेगवेगळ्या कारणांमुळे अंधत्व येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मधुमेह हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. या पाश्र्वभूमीवर नेत्रदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो, मात्र अवघे पन्नास हजार लोकच नेत्रदान करतात. देशात किमान दोन लाख अशा अंध व्यक्ती आहेत की ज्यांना डोळे मिळाल्यास त्यांना दृष्टी येऊ शकते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्याला किमान २५ हजार डोळ्यांची गरज आहे. प्रत्यक्षात अवघे सात हजार डोळेच दरवर्षी मिळतात. त्यातही प्रत्यक्षात वापरता येण्याजोगे ज्यामुळे दृष्टी मिळू शकते, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. जे. जे. रुग्णालयातील नेत्रपेढीला दरवर्षी सुमारे तीनशे डोळे नेत्रदानातून उपलब्ध होतात. त्यातून दीडशे लोकांना दृष्टी मिळते तर ज्यांचे डोळे पूर्णत: निकामी झाले आहेत अशांना दीडशे डोळे बसविले जातात. बहुतेक वेळा वयोवृद्ध लोकांचे डोळे नेत्रदानातून उपलब्ध होत असल्यामुळे यातील फारच थोडे डोळे हे प्रत्यक्ष दृष्टी मिळण्यासाठी योग्य ठरतात. त्यामुळे श्रीलंका अथवा काही पाश्चिमात्य देशांमध्ये जसा कायदा आहे तसा कायदा भारतात करणे आवश्यक असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. श्रीलंकेत दरवर्षी सुमारे एक लाख लोकांचा मृत्यू होतो व दोन लाख डोळे त्या देशाला उपलब्ध होतात. यातील त्यांची गरज वगळता उर्वरित डोळे हे अन्य देशांना दिले जातात. भारतातही श्रीलंकेतून दरवर्षी दहा हजार डोळे निर्यात केले जातात. तेथील कायद्यानुसार मृत्यूनंतर डोळे ही देशाची संपत्ती मानली जाते. अन्य काही देशांत अपघात अथवा अनैसर्गिक मृत्यूनंतर कायद्याने नेत्रदान बंधनकारक केले आहे. भारतात असा कायदा केल्यास हजारो लोकांना दृष्टी मिळू शकेल मात्र असा कायदा करण्याची इच्छाशक्ती राज्यकर्ते दाखवणार का, हा कळीचा मुद्दा आहे.