मुंबई-गोवा महामार्गावरील राजेवाडी फाट्याजवळील ब्रिटीश काळात बांधलेला आणि शंभर वर्षे जुना पूल सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. महाड येथे सावित्री नदीवर असलेला हा पूल जुना झाल्यामुळे बारा वर्षांपूर्वी त्याच पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आला होता. नवीन पुलाची बाधणी झाल्यानंतरही जुना पूल वापरात होता. दरम्यान, नवीन आणि जुना पुलावरही प्रशासनातर्फे टोलवसुली केली जात होती. दोन वर्षांपूर्वी हे दोन्ही पूल टोलमुक्त झाले होते. गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला पूर आल्याचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला होता.
राजेवाडी फाट्याजवळील वाहून गेलेल्या या पुलावरून राजपूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बससह सहा ते सात वाहने सावित्री नदीच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या वाहनांचा आणि त्यामधील प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलालाही पाचारण करण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या ३६ ब्रिटीशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.