फेरीवाला म्हणजे रस्त्यावर फिरून माल विकणारा. मुंबईत मात्र ही व्याख्या बदलते. रस्त्याच्या कडेला, पदपथांवर वगैरे बसून माल विकणाऱ्यास मुंबईत फेरीवाला म्हणतात. असून अडचण आणि नसून खोळंबा अशी ही संस्था. तिचे आणि मुंबईचे नाते अगदी जुने. मुंबई शहरात पूर्वी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या संधीकाली जागोजागी लहान मोठे असे अठरा बाजार होते. तेव्हाही तेथे असे फेरीवाले असतच. आणि त्यांची एकंदर वर्तणूक आजच्याप्रमाणेच होती. तेव्हाही सर्वसाधारण ग्राहकास ‘गिऱ्हाईक’ करणे हा त्यांचा स्वाभाविक छंद होता. मुंबईतील बाजार आणि त्यातील हे फेरीवाल्यांसारखे दुकानदार यांचे काही धमाल किस्से ‘मुंबईचे वर्णन’मध्ये गोविंद माडगांवकर यांनी दिले आहेत.

मुंबादेवीच्या देवळामागे तेव्हा बाजार भरत असे. त्यातील भुसाऱ्यांच्या दुकानांचे चित्रच त्यांनी वाचकांसमोर मांडले आहे. ते सांगतात, ‘दोन्हीं बाजूंनी भुसाऱ्यांची दुकानें. ज्यांत अनेक प्रकारचें धान्य टोपल्यांत व मोटय़ांत भरून ठेविलें आहे, व मारवाडी लोक चौरंगावर बका सारिखे गिऱ्हाईकाची मार्गप्रतीक्षा करीत आहेत. आणि जे कोणी त्यांच्या तावडीस सांपडतील त्यांस फसविण्यास अनेक युक्ति करीत आहेत. यांच्या पाशांत सांपडलें असतां ठकल्यावांचून निभाव होणें कठीण. तशांत उचापतीचें खातें असलें ह्मणजे काय विचारता? एकाचे दोन. उचापतीचें पोतें आणि सवाहात रितें अशी ह्मणच आहे.’

‘मार्किट’ म्हणजे तेव्हाच्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेला जुम्मा मशिदीजवळचा बाजार. ‘तो सोडून दक्षिणेकडेस म्हणजे कापाकडेस जायास निघाले असता’ रस्त्यावर जो बाजार भरत असे त्याचेही मोठे बहारदार वर्णन माडगांवकरांनी केले आहे. हे वर्णन वाचले म्हणजे एवढय़ा वर्षांनंतर परिस्थिती फार बदलली आहे असे काही म्हणता येत नाही. ते सांगतात, ‘मार्किटांतील परचूरण माल विकणारे लोक बहुतकरून मगरूर व बेपरवा असतात. कोणी कितीही सात्त्विक व अब्रूवाला त्यांच्या दुकानांवर माल घेण्यास गेला असतां आर्जवानें बोलायचेच नाहींत. मिच्र्या, कोथिंबीर विकणारे देखील ह्य़ाप्रमाणें वागत असतात. ते एका पैच्या पदार्थास अर्धआणा किंमत मागतील इतकेंच नाहीं. परंतु असें म्हणतील – पाहिजेतर घे नाहींतर चालताहो. इतके हे लोक उद्धट असतात.’

कापड बाजारातील फसवणुकीचा मासलाही त्यांनी दिला आहे. ‘पुढें कापडबाजार, ह्य़ा ठिकाणीं सुमारें शंभर दीडशें दुकानें आहेत. यांत विलायती कापड, धनवडी सणंगें, किनखाप व अनेक तऱ्हेचीं उंची वस्त्रें विकतात. मुंबईंतील सर्व प्रकारच्या तर्कटाचा व लबाडीचा उत्तम प्रकारचा मासला एथें सांपडतो.’

तो कसा? तर – ‘दुकानांत दाट पडदे लावून अंधार केला आहे, व पुढें बांकेवर मानभावाचें सोंग घेऊन एक दोन भाटय़े डोकें बाहेर काढून टपत बसले आहेत, आणि कोणीं गैरमाहीत भोळसर गृहस्थ कांहीं सणंगें खरेदी करायास आला असतां त्यांस फसवीत आहेत. हा सर्व प्रकार दृष्टीस पडतो. हे मुंबईतील साधे भोळे व्यापारी एका रूपयाच्या सणंगास पांच रूपये किंमत मागतात, इतकेंच नाहीं, परंतु पांच रूपये घेऊनही ठेवणीचें, फाटकें, असे कापड त्याच्या हातीं लावितात. आणि समयानुसार तो कांही तक्रार करूं लागला तर त्यांस मुष्टिमोदक व थापटपोळ्या देण्यासही मागें पुढें पहात नाहीत.’

मुंबईचे भामटे हा शब्दप्रयोग बहुधा आला असावा तो या बाजारांतूनच असे हे सारे वाचून वाटावे.