News Flash

मुंबई बडी बांका : ते ‘राष्ट्रद्रोही’?

इतिहासकार न. र. फाटक यांनी त्याला ‘शिपायांची भाऊगर्दी’ असे म्हटले होते.

सन १८५७ : कापाच्या मैदानात एका हवालदार आणि शिपायास तोफेच्या तोंडी दिले, तेव्हाचे चित्र. 

मुंबईच्या इतिहासातील एका वळणावर कोणत्याही वाचकाला ठेचकळायलाच नाही, तर तोंडावर आपटायलाच होते! हे वळण आहे सन १८५७ मधले. आणि बाब आहे आपल्या राष्ट्रप्रेमाची..

आता आपल्याला हे माहीतच असते की १८५७ साली १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध झाले! पूर्वी त्याला बंड म्हणत. इतिहासकार न. र. फाटक यांनी त्याला ‘शिपायांची भाऊगर्दी’ असे म्हटले होते. पुढे सावरकरांनी पुस्तक लिहून सांगितले की ते ‘स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्ययुद्ध’ होते. आज आपण तेच मत ग्रा मानतो. मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांना स्वातंत्र्ययोद्धे मानतो. यावेगळे मत कोणी मांडले तर त्यास राष्ट्रद्रोही म्हणतो.

पण या न्यायाने तेव्हाची सगळी मुंबईच राष्ट्रद्रोही होती असे म्हणावे लागेल, लोकहो. आणि आपले ‘मुंबईचे वर्णन’कार गोविंद नारायण मांडगावकर यांची रवानगी तर थेट ‘पुरस्कारवापसी टोळी’मध्येच करावी लागेल. कारण त्यांच्या दृष्टीने ते युद्ध म्हणजे ‘काळ्या पलटणीं’नी ‘फितूर’ होऊन माजविलेला ‘दंगा’ होता! ते ‘महाअरिष्ट’ होते!

ते सांगतात – या बंडामुळे ‘हिंदुस्थानातील रयतेची व कंपनी सरकारची फारच नासाडी झाली.. परंतु ईश्वरकृपेने मुंबई इलाख्यातील पलटणींत काही बंड झाले नाही व मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या केसासही धक्का लागला नाही.’

एक खरे की त्यावेळी मुंबईतील लष्करातील दोघे जण बंडकऱ्यांना सामील असल्याचा संशय होता. ते दोघे कोण हे इतिहासाला माहीत नाही. पण त्यांना ‘कापाच्या मैदानात सर्व पलटणीसमोर उभे करून तोफेचे तोंडी देऊन उडवून टाकिले.’

हे पाहून मुंबईकरांमध्ये असंतोष निर्माण व्हावा की नाही? पण झाले ते वेगळेच. ‘हे महा अरिष्ट उपस्थित झाल्यापासून ते दूर होईपर्यंत मुंबईंतील सर्व जातीच्या लोकांनी तीन खेपा आपापल्या देवालयात जमून इंग्रजांस जय प्राप्त व्हावा व त्यांचे राज्य कायम रहावे व त्याला संकटात पाडू नये म्हणून प्रार्थना केल्या. तशाच बंड मोडून जिकडे तिकडे स्वस्थपणा झाल्यानंतर ईश्वराचे गौरव वर्णण्यासाठी मुंबईतील सर्व शेटसावकार, इंग्रज, सरकारी कामगार व सर्व लोकांनी आपापला आनंद प्रदर्शित करण्यासाठी आपापल्या कारखान्यात सुटी दिली होती आणि जागोजागी व देवळात जमून ईश्वराचा स्तव व प्रार्थना केल्या.’

आले ना लक्षात? आजचे आपले ‘१९५७ चे स्वातंत्र्ययुद्ध’ त्या काळातल्या मुंबईकरांना ‘राष्ट्रीय संकट’ वाटत होते. त्या बंडवाल्यांचा, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई आदींचा नि:पात व्हावा म्हणून येथील देवळात, मशिदीत, चर्चमध्ये प्रार्थना केल्या जात होत्या. काहींनी तर त्यासाठी खास कवने, पदे, श्लोक, अभंग, आर्या, दिंडी, ओव्या नि साक्या रचल्या होत्या. त्याचे अनेक मासले मांडगावकरांनी दिले आहेत. त्यातील हे एक पद –

जगदीशा कैसें संकटीं पाडिलें ।। दयाळू ऐशा राजाला त्रासिलें ।।

विद्यमृतवृष्टी केली या राजानें।।

प्रजाही आणि चालवी न्यायानें।।

ऐशाला देवा दुखविलें बंडानें ।।

करांवें शांत दुष्टांस दंडानें।।

आणि ही एक आर्या –

करुणेचा सागर तूं दीनाचा नाथ भक्त कैवारी ।।

ऐशीं बिरुदें गाजति, वर्णिती कवी म्हणुनिं हें भय निवारी ।।

एक अभंग सांगतो –

दीन बाळकें मारिली ।। घरें फारच जळालीं ।।

स्त्रिया अबला असूनीं ।। त्याही मारील्या दुष्टांनीं ।।

ऐशा अनर्थ समयाशीं ।। देवा कोठें गुंतलासीं ।।

एका पदात तर देवास थेटच विनविले होते, की –

युगीयुगीं तूं भक्त रक्षिसी ।। दुर्जन मारूनि जे ।। कृपाघना संकट जाणुनि ये..

मुंबईकर त्या बंडाकडे कोणत्या नजरेने

पाहात होते हे या पदांतून स्पष्ट होते. आता प्रश्न एकच उभा राहतो, की आजच्या आपल्या कसोटय़ा तेव्हाच्या इतिहासाला लावून मुंबईकरांना राष्ट्रद्रोही म्हणायचे की कसे? प्रश्न खरोखरच ठेचकळवणाराच नव्हे, तर तोंडावर आपटवणारा आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:29 am

Web Title: history of mumbai 2
Next Stories
1 आता पेंग्विन दर्शनावरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा
2 मटक्याचे आकडे प्रसिद्ध करण्यास वृत्तपत्रांना मनाई
3 एल अँड टी, शापुरजी पालनजी यांच्या बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी निविदा
Just Now!
X