विनायक परब

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

भाईंदर ते वांद्रय़ांपर्यंत पसरलेल्या या साष्टीमध्ये म्हणजेच प्राचीन मुंबईमध्ये अनेकानेक गोष्टी मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातील पुरातत्त्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सापडण्याची एक मालिकाच २०१० पासून सुरू झाली. विविध ठिकाणी सापडणाऱ्या या सर्व पुरातत्त्वीय गोष्टी मुंबईचे प्राचीनत्व पुरते स्पष्ट करणाऱ्या होत्या. हे पुरावे होते मध्ययुगातील, तर काही थेट अश्मयुगाशी नाते सांगणारे; पण प्रत्यक्षात मुंबईच्या संदर्भातील इतिहासाच्या नोंदी या केवळ पोर्तुगीजांच्या आगमनानंतरचीच माहिती देणाऱ्या होत्या. १५५५ साली पोर्तुगीज मुंबईत आले आणि तेव्हापासून मुंबईच्या इतिहासाला सुरुवात झाली, असे सांगितले आणि लिहिले जात होते.

प्रत्यक्ष मुंबई विद्यापीठातर्फे पार पडलेली गवेषणे (एक्स्प्लोरेशन) मात्र वेगळेच काही दिशानिर्देश करणारे होते. २०१३ साली साठय़े महाविद्यालयाच्या विनायक परब आणि डॉ. सूरज पंडित यांना कान्हेरीच्या मागच्या बाजूस आताच्या ११० लेण्यांपेक्षाही आधीच्या कालखंडातील म्हणजेच इसवी सनपूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकांतील सात लेणींचा शोध घेण्यात यश आले. यातील एका महाविहारामध्ये तर बौद्ध स्तूपाचे अवशेषही सापडले.

विद्यापीठातील पुरातत्त्व केंद्राच्या काही विद्यार्थ्यांना माहीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका ठिकाणी मध्ययुगीन कालखंडातील भल्या मोठय़ा मंदिराचे अवशेष सापडले. मंदिराच्या छताचा भाग तोलून धरणारे स्तंभांवरील कीचकाच्या शिल्पकृती सापडल्या. त्याच्या आकारमानावरून मंदिराची व्याप्ती सहज लक्षात येत होती.

धक्कादायक बाब म्हणजे माहीम पोलीस ठाण्यात गेलेल्या विद्यार्थ्यांना तर पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच मोठय़ा मंदिरातील शिल्पकृतींचे अनेक महत्त्वपूर्ण अवशेष सापडले. त्यातील काही तर भिंतीमध्ये चिणलेले होते, तर काही सिमेंटमध्ये कायमस्वरूपी राखलेले. याचा अर्थ ते मध्ययुगीन मंदिराचे अवशेष आहेत याची कल्पना तर खुद्द पोलिसांनाही नव्हतीच.

संदीप दहिसरकर या विद्यार्थ्यांला गोरेगाव येथे राम मंदिर मार्गावर (विद्यमान राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ) मध्ययुगीन शीव मंदिराचे अवशेष लक्षात आले. साठय़े महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांना मरोळ परिसरामध्ये अनेक मध्ययुगीन पुरावशेष सापडले त्याचीही नोंद करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या हाती लागलेल्या मुंबईतील या प्राचीन आणि मध्ययुगीन खजिन्यानंतर असे लक्षात आले की, मुंबईचे प्राचीनत्व पोर्तुगीज येण्याच्याही शेकडो वर्षे आधीपर्यंत मागे जाणारे आहे. मात्र त्याचा आजवर कधीच पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. म्हणून मग पुरातत्त्व केंद्र अधीन असलेल्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या संचालक मुग्धा कर्णिक यांनी साष्टीच्या गवेषणाचा निर्णय घेतला. साठय़े महाविद्यालय आणि इंडिया स्टडी सेंटर (इन्स्टुसेन) यांना सोबत घेण्यात आले. भारतीय पुरातत्त्व खात्याची परवानगीही या गवेषणासाठी मिळविण्यात आली आणि २०१५ साली गवेषणाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली. २०१६ आणि २०१७ अशा दोन वर्षांमध्ये मुंबईच्या साष्टी बेटाचे गवेषण पद्धतशीरपणे पार पडले.

शहर किंवा नगर पुरातत्त्वामधील (अर्बन आर्किऑलॉजी) हा दक्षिण आशियातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. म्हणून या प्रकल्पाला एक वेगळे महत्त्व आहे. पुरातत्त्वीय ठिकाण म्हणजे गाव किंवा गावाबाहेर असाच आजवरचा समज होता. त्या समजाला या प्रकल्पाने यशस्वी छेद दिला आणि भारतातील पहिला अर्बन आर्किऑलॉजीचा प्रकल्प अस्तित्वात आला. शहर हे खरे तर अनेकदा मूळचे गावच असते. विकासाच्या अनेक टप्प्यांमधून जात त्याला शहरत्व प्राप्त होते तेव्हा त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो. हा बदल नेमका कसा झाला हे समजून घेणे महत्त्वाचे असते. या विकासात स्थानिक भूगोल महत्त्वाची भूमिका बजावतो. आगामी काळामध्ये अर्ध्याहून अधिक जग हे शहरामध्ये राहणारे असेल तर शहरांच्या पुरातत्त्वाला त्या वेळेस अधिक महत्त्व आलेले असणार. शहरांच्या पुरातत्त्वाचा पद्धतशीर अभ्यास महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाची पायाभरणी म्हणूनच महत्त्वाची होती.

प्रकल्पाच्या प्रशासकीय आणि विशिष्ट बाबी सापडण्याची शक्यता गृहीत धरून पाच पुरातत्त्व तज्ज्ञांकडे शहराचे पाच भाग करून धुरा सोपविण्यात आली. कामाला सुरुवात झाली आणि पहिल्याच वर्षी अनेक सुखद धक्के बसत गेले. या महामुंबईमध्येच कुठे झोपडपट्टीमध्ये तर कुठे इतरत्रही लेणी सापडतील अशी कल्पनाही कुणी केलेली नव्हती. शीव येथे अर्ध्या छाटलेल्या अवस्थेतील, तर चुनाभट्टीला पूर्ण व्यवस्थित अवस्थेतील लेणी सापडली. एवढेच नव्हे तर गधेगळ आणि वीरगळही सापडले! आणि अखेरच्या टप्प्यात सापडलेल्या शिलालेखाने तर आता मुंबईचा इतिहासच बदलण्यास सुरुवात केली आहे!