महाराष्ट्राच्या प्रबोधन काळाचे विविध पैलू संशोधन, लेखनातून उलगडणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक प्रा. ज. वि. नाईक यांचे सोमवारी पहाटे ५ वाजता वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

प्रा. नाईक हे इतिहास संशोधन क्षेत्रातील अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि इस्माईल युसूफ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९७३ ते १९९४ या काळात ते मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख होते. शास्त्री इण्डो-कॅनेडियन इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन कॅनडा यांच्या वतीने नाईक यांना फेलोशिप देण्यात आली होती. याअंतर्गत त्यांनी कॅनडातल्या काही विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली. तसेच देशविदेशातील परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. भारतीय इतिहास परिषदेचे सर्वसाधारण अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे व्हिजिटिंग फेलो म्हणून नाईक यांनी कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि बडोद्याचे एम. एस. विद्यापीठ येथे व्याख्याने दिली होती. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालयाचे ते सदस्य होते. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयी नाईक यांना विशेष आपुलकी होती. ते प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासासाठी ओळखले जातात.

नाईक यांचे विविध संशोधनपर लेखन १९७० ते १९९० या काळात प्रसिद्ध झाले. त्यापैकी २० निबंधांचा संग्रह ‘कलेक्टेड वर्क्‍स ऑफ जे. व्ही. नाईक’ या नावाने एशियाटिक सोसायटीने प्रकाशित के ला आहे. महाराष्ट्रातील शाळांसाठी पाठय़पुस्तकनिर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जार्विस बंधूंविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात काम करत असताना ज. वि. नाईक हे माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी वरिष्ठ होते. पण त्यांच्या वरिष्ठपणाचे दडपण त्यांनी कधीही आमच्यावर येऊ दिले नाही. एखादी गोष्ट त्यांनी सुचवली आणि आम्हाला नाही पटली तर आम्ही ती स्पष्टपणे नाकारू शकत असू. सर्वानुमते जे योग्य असेल तेच ते करत. आम्हाला एखादा प्रश्न पडला तर, त्यावर त्यांचे चांगले मार्गदर्शन मिळत असे.

आमचे लिखाण प्रसिद्ध झाल्यावर फोन करून ते ‘मला तुझा अभिमान वाटतो’, असे म्हणत. त्यांचे वाचन अफाट होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशीही फोनवर आमच्या छान गप्पा झाल्या होत्या, अशा शब्दांत निवृत्त प्राध्यापिका डॉ. वासंती दामले यांनी प्रा. नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रा. ज. वि. नाईक एक ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक, लेखक तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर तसेच व्यक्तींवर त्यांनी केलेले संशोधन व लिखाण बहुमोल स्वरूपाचे आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले तसेच संशोधकांना मार्गदर्शन के ले. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

– चे. विद्यासागर राव, राज्यपाल

ज. वि. नाईक हे अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचा हातखंडा होता. इतिहासाशिवाय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्येही त्यांना रस होता.

– डॉ. दिलीप नाचणे, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलमेंट अ‍ॅण्ड रिसर्च

इस्माईल युसूफ महाविद्यालयात ज. वि. नाईक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते मुंबई विद्यापीठात गेल्यानंतर त्यांचे महाविद्यालयातील पद माझ्याकडे आले. काही वर्षांनी मीसुद्धा विद्यापीठात त्यांच्यासोबत काम करू लागलो. त्यांचे मराठी वाचन अप्रतिम होते. महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी त्यांना विशेष ओढ होती. प्रार्थना समाज, न्या. रानडे यांच्याविषयी त्यांनी अभ्यास केला होता. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर पीएचडी पूर्ण केली आहे.

– प्रा. अरविंद गणाचारी, निवृत्त प्राध्यापक

ज. वि. नाईक हे माझे गुरू होते. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विषयात पीएचडी केली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. कुठल्याही परिस्थितीत ते प्रोत्साहन देत असत. कायम मदतीसाठी तयार असत.

– अनिश प्रधान, तबलावादक