गावदेवीतील रस्त्यांवर पालिकेचा प्रयोग

मुंबईतील अनेक रस्ते त्यांच्या नावांनिशी प्रसिद्ध आहेत; परंतु या रस्त्यांना अमुक एका व्यक्तीचेच नाव का मिळाले किंवा ती व्यक्ती कोण, याबाबत अनेकदा सर्वसामान्यांमध्ये अज्ञान आढळून येते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने रस्त्यांच्या नामफलकाशेजारी त्याचा इतिहास उलगडून दाखवणारे फलक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खाकी हेरिटेज फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्यातून नाना चौक आणि गावदेवी विभागातील चार रस्त्यांवर हा प्रयोग करण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईतील नाना चौक, गावदेवी परिसरातील रस्त्यांना नवीनच ओळख मिळाली आहे. या संपूर्ण परिसरालाच स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाचा स्पर्श झालेला आहे. मात्र या विभागात राहणाऱ्यांनाही या रस्त्यांच्या नावाचा खरा इतिहास माहीत नसतो. येथील मणिभवन, ऑगस्ट क्रांती मैदानात भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना हा इतिहास माहीत व्हावा याकरिता डी विभागाने नवीन प्रयोग केला आहे. रस्त्यांना ज्या मोठय़ा व्यक्तींची नावे दिलेली आहेत, त्यांच्या कर्तृत्वाची ओळख त्यामुळे होऊ शकणार आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांची ही ओळख वाचता येणार आहे. खाकी हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक आणि इतिहास संशोधक, अभ्यासक भरत गोठोस्कर यांनी या कामात पालिकेला ऐतिहासिक माहितीबाबत सहकार्य केले आहे.

मुंबईतील रस्त्यांना नाव देण्याचा अधिकार नगरसेवकांना असतो.  एखाद्या थोर व्यक्तीचे नाव देण्यासाठी त्यांच्या कार्याची महती प्रस्तावात द्यावी लागते. त्या नावाला सभागृहाची मंजुरी मिळाली की, पालिकेने रस्त्यावर लावलेल्या फलकावर फक्त नाव झळकते; पण इतिहास प्रस्तावाच्या कागदपत्रांवरच राहतो. हाच इतिहास या नव्या प्रयोगामुळे खुला होणार आहे.

डी वॉर्डचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर चार रस्त्यांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. रस्त्याचे आताचे नाव आणि ब्रिटिशांच्या काळातील नाव या दोन्हींचा इतिहास फलकावर देण्यात आला आहे.

– भरत गोठोस्कर, खाकी हेरिटेज फाऊंडेशन