हिट अॅंड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी, यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांकडून बुधवारी न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखल देऊन जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सलमान खान ‘बीईंग ह्युमन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करीत असलेल्या समाज कार्याचाही शिक्षा सुनावण्यापूर्वी विचार करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला. मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सलमानला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. तो अभिनेता असल्यामुळे त्याला कायम वेगळी वागणूक मिळत आली आहे. न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा दिल्यास समाजामध्ये वेगळा संदेश जाईल, असा युक्तिवाद घरत यांनी केला.
हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानवरील सर्व आरोप सिद्ध होत असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व कलमांखाली तो दोषी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने दोन्ही पक्षांना त्यांचा युक्तिवाद करण्यास सांगितले.
बचाव पक्षाचे वकील शिवदे म्हणाले, २००२ मध्ये घडलेल्या घटनेनंतर सलमान खान खूप बदलला आहे. या घटनेनंतर त्याने एकही नियम मोडलेला नाही. या घटनेतील सर्व जखमींना १९ लाख रुपयांची नुकसान भरपाई २००२ मध्येच त्याच्याकडून देण्यात आली आहे. २००७ पासून ‘बीईंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यासाठी सलमान खानने ३२ कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च केले आहेत. एकूण ६०० मुलांवर या माध्यमातून ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या स्वरुपाच्या इतर खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही दोषींना तीन वर्षांपेक्षा जास्त मोठी शिक्षा दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने सलमान खानला तीन वर्षांपेक्षा जास्त मोठी शिक्षा करू नये, असा युक्तिवाद त्यांनी केला.
सलमान खानला मेंदूविकार असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले. ही माहिती वकील न्यायालयाला द्यायला लागल्यावर सलमानने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, वकिलांकडून यासंबंधीची सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सलमानला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. तो अभिनेता असल्यामुळे समाजात त्याला कायम वेगळी वागणूक मिळते. या खटल्यामध्ये त्याला कठोर शिक्षा देण्यात आल्यास समाजामध्ये वेगळा संदेश जाईल, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, हा युक्तिवाद सुरू असतानाच बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यावर हरकत घेतली. कायद्यापुढे सर्वजण समान असतात. त्यामुळे सलमान खानला कठोर शिक्षा दिल्यामुळे कोणताही वेगळा संदेश समाजामध्ये जाणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.