मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून त्यातील एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सध्या सदोष मनुष्यवधाचा खटला चालविण्यात येत आहे. हा खटला अंतिम टप्प्यात असून, त्याच्या निकालाची तारीख सत्र न्यायालय २० एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सलमान दोषी की निर्दोष याचा निर्णय होणार आहे.
सलमानच्या विरोधात सरकारी पक्षाने २७ साक्षीदार तपासले असून, सलमानच्या वतीने त्याचा चालक अशोक सिंह याचीच साक्ष नोंदविण्यात आली आहे. याच अशोक सिंहने न्यायालयासमोर हजर होत अपघात सलमानने नाही तर आपण केल्याचा दावा करत खटल्याला नवे वळण दिले होते.
दरम्यान, अपघातानंतर सलमान पळून गेला नव्हता, तर कारखाली चिरडलेल्यांच्या मदतीसाठी तो धावून गेला होता. कार उचलून त्याखाली आलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न तो करीत होता. मात्र त्याला त्यात अपयश आले. तसेच संतप्त जमावाला घाबरून त्याच्या हितचिंतकांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले होते. तो स्वत: तेथून पळून गेला नव्हता, असा दावा सलमानच्या वकिलांतर्फे शनिवारी करण्यात आला. तो घरी सापडला नसल्याचा पोलिसांचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले.