भरधाव वेगात गाडी चालविणाऱ्या मद्यधुंद चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पदपथावरून जाणाऱ्या तीन तरुणींना धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री चुनाभट्टी येथे घडली. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून चुनाभट्टी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चालकासह दोघांना अटक केली आहे.

अर्चना पोर्टे (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव असून ती चुनाभट्टीतील ताडवडी परिसरात राहत होती. एका खासगी कंपनीत कामाला असलेली अर्चना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास कामावरून घरी येत होती. याच वेळी तिला चुनाभट्टीतील साई मंदिर परिसरात पूजा शहापूरकर (१९) आणि समीक्षा माळी (२१) या दोन मैत्रिणी भेटल्या. बाजारात जात असलेल्या या दोघींसोबत अर्चनाही निघाली.

स्वदेशी मिल परिसरातून जात असतानाच तेथे भरधाव वेगात आलेल्या असेंट मोटारगाडीने या तिघींना धडक दिली. चालकाचा मोटारगाडीवरील ताबा सुटल्याने ती पदपथावर आली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना त्याब्यात घेतले आहे. याप्रकरणी गु.र.क्र. 315/19 कलम 304(2), 279, 34 भा.दं.वि. सह 184, 185,188, 134 (अ), (ब) मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.