आंतरजिल्हा सार्वजनिक वाहतुकीची सुविधा सुरू नसल्यामुळे कामानिमित्त विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना खासगी वाहतूक खर्चाचा मोठा भुर्दंड टाळेबंदीं काळात सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांत दहापट अधिकचे पैसे देत अनेकांना आपले घर गाठावे लागले. एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू होण्याची चिन्हे अद्याप दिसत नसल्याने आणखी काही दिवस हा भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास देण्यात येऊ लागले. कामानिमित्त एखाद्या शहरात टाळेबंदीत अडकलेल्यांची त्यामुळे सोय झाली. मात्र आंतरजिल्हा प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे या प्रवाशांना खासगी वाहतुकीचाच पर्याय स्वीकारावा लागत होता. पण यासाठी अवाच्या सवा खर्च करावा लागत आहे. अनेकांसाठी हा भुर्दंडच ठरला आहे. स्थलांतरितांना मोफत सुविधा देत असताना, राज्यातील नागरिकांसाठी हा दुजाभाव का असा प्रश्न अडकलेल्यांनी उपस्थित केला.

टाळेबंदी लागू होण्यापूर्वी मुंबईत उपचारांसाठी आलेल्या काही रुग्णांचा परतीचा मार्ग बंद झाला. त्यातील अनेकांना वांद्रे येथील उत्तर भारतीय संघाच्या निवारा शिबिरात सामावून घेतले. आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी मिळण्याची सुविधा होती, मात्र प्रवासासाठी सार्वजनिक वाहन नसल्याने अनेकजणांना चौथ्या टप्प्यातदेखील येथेच राहावे लागले. मालेगावजवळच्या गावातील उमेश आडे पत्नीच्या पोटाच्या विकारावर इलाज करण्यासाठी टाळेबंदीपूर्वीच मुंबईत आले होते. टाळेबंदीत ते या निवारा शिबिरात राहिले. ई-पासची सुविधा झाल्यावर त्यांनी गाव गाठले. मात्र मुंबई ते मालेगाव प्रवासासाठी त्यांना सहा हजार रुपये द्यावे लागले. ‘इतका खर्च करण्याची आमची ताकदच नाही, मात्र घरी दोन लहान मुले असल्याने दोन महिन्यांनंतर हा पर्याय स्वीकारल्याचे’, उमेश आडे यांनी सांगितले.

दादर येथील शांताराम कदम आणि त्यांच्या पत्नी हे दोघे ज्येष्ठ नागरिक गावातील घराच्या कामानिमित्त रत्नागिरी जिल्ह्य़ातील बोरस येथे गेले आणि टाळेबंदीत अडकले. परत येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही आणि खासगी वाहनांची उपलब्धतादेखील मर्यादित होती. त्यासाठी प्रतिमाणशी किमान पाच हजार रुपये मोजावे लागणार असल्याने गावीच थांबावे लागल्याचे कदम यांनी सांगितले. वसई येथील रेल्वे कर्मचारी सपत्नीक कुडाळ येथे टाळेबंदीपूर्वीच गेले होते. सार्वजनिक वाहतुकीच्या अभावी त्यांना प्रवास करणे अशक्य झाले. पण वसईत पुन्हा येणे गरजेचे असल्याने नाइलाजास्तव प्रतिमाणशी सहा हजार रुपये मोजून कुडाळ ते वसई प्रवास केला.

नोकरी, स्पर्धा परीक्षा तयारी अशा अनेक कारणांसाठी अनेकांचे शहरात स्थलांतर झालेल्यांना या काळात दुहेरी फटका बसला आहे. टाळेबंदीत अनेक आस्थापनांची सर्वच कामे ठप्प झाली. अशा वेळी शहरात थांबण्यापेक्षा गावी जाण्याचा पर्याय अनेकांनी चाचपून पाहिला. मुंबईत मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जमिमा रोहेकर यांना या काळात पुण्याला जाण्यासाठी चार हजार आठशे रुपये मोजावे लागले. एरवी खासगी वाहनाने जरी हा प्रवास केला असता त्यापेक्षा ही रक्कम दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या सुदर्शन गवळे टाळेबंदीत अडकले होते.  यवतमाळ येथे गावी जाण्यासाठी त्याला तब्बल सात हजार रुपये खर्च करावे लागल्याचे त्याने सांगितले.

मुंबई-पुणे प्रवासासाठी पाच ते सात हजार भाडे

एसटी आणि रेल्वेची किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीची आंतरजिल्हा सुविधा नसल्याने खासगी वाहतुकीसाठी अवाच्या सवा खर्च करावा लागणारी अशी उदाहरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. मुंबई-पुणे प्रवासासाठी पाच ते सात हजार रुपये, पुणे-सातारासाठी किमान चार हजार रुपये, पुणे-कोल्हापूरसाठी सहा हजार रुपये, अलिबाग-रायगडसाठी तीन हजार रुपये अशी खासगी वाहनांची दर आकारणी सुरू आहे.