दिवसभर घामाच्या धारांनी त्रासून गेलेल्या मुंबईकरांना शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी आल्हाददायक दिलासा दिला. पावसाने हळूहळू काढता पाय घेण्यास सुरू केल्याने आणखी काही दिवस हवामानाचा हा लहरीपणा अनुभवावा लागणार आहे. त्यामुळे दिवसा प्रचंड उकाडय़ाला तोंड द्यावे लागणार असले तरी रात्री वातावरण थंड राहून दिलासा मिळेल. तर अधूनमधून पाऊसही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देईल.
शनिवारी वातावरणात झालेला बदल विशेषत्वाने जाणवला तो सायंकाळी आकाशात झालेल्या पिवळ्या, केशरी, काळ्या रंगांच्या उधळणीने. पण ही उधळण अल्पकाळातच निवळली. कारण थोडय़ाच वेळात काळ्या ढगांनी आकाश व्यापले. त्यानंतर ढगांचा आणि विजांचाच पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. त्यात मग पावसानेही आपले राज्य घेत कच्चा गडी नसल्याचे दाखवून दिले. ढग, विजा आणि तूफान सरींचा हा खेळ उशिरापर्यंत सुरू राहिला.

वातावरणातील आद्र्रतेचे प्रमाणही वाढले आहे. त्यात तापमान वाढल्याने आकाशात उंचच्या उंच ढग तयार होतात. हे ढग मग रात्री गडगडाट आणि कडकडाट करून मस्ती करतात. केवळ मुंबईच नव्हे तर पनवेल, रोहा, नाशिक या पट्टय़ातही याच प्रकारचे
वातावरण आहे.

तापमानाचा पारा चढाच
पावसाने काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याने गेले काही दिवस वातावरणात प्रचंड उकाडा आहे. गेल्या पाच दिवसांत तर कमाल तापमान कलेकलेने वाढतेच आहे. उदाहरणार्थ ११ सप्टेंबरला कुलाबा येथे ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सांताक्रूझमध्येही तापमान साधारणपणे तेवढेच होते. पण गेल्या पाच दिवसांत ते थोडेथोडे वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी कुलाबा येथे कमाल ३२.७, तर सांताक्रुझमध्ये ३२.४ अंश सेल्सिअस असा तापमानाचा पारा चढा राहिला. तर हेच किमान तापमान अनुक्रमे २७ आणि २५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

पाऊस परतीच्या प्रवासाला लागला की वातावरणात असे बदल होत असतात. त्यात काही नवीन नाही. या काळात दिवसा तापमान जास्त असते, तर रात्री वातावरण आल्हाददायक असते. त्यातून दिवसा जितके तापमान जास्त तितक्या जोरदारपणे रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट अनुभवायला मिळेल
       – के. एस. होसाळीकर,
          मुंबई हवामानशास्त्र   
    विभागाचे उपमहासंचालक