निष्णात वकीलांनी केलेला युक्तिवाद आणि मुंबई पोलीसांचा कमकुवत तपास याचा फायदा शुक्रवारी सलमान खानला ‘हिट अॅंड रन’ प्रकरणात मिळाला आणि सत्र न्यायालयाने त्याला दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणात तरी तुरुंगात जाण्याची वेळ सलमान खानवर तूर्त येणार नाही.
जामीन याचिकेवरील सुनावणीवेळी सलमान खानचे वकील अमित देसाई यांनी आपल्या युक्तिवादात कमाल खानचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. अपघात घडला त्यावेळी गाडीमध्ये कमाल खानही होता. मग सरकारी पक्षाने आत्तापर्यंत कमाल खानची साक्ष का नोंदविली नाही, असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला. कोणत्याही खटल्याच्या निकाल देण्यापूर्वी सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदविली गेली पाहिजे. मात्र, या खटल्यात कमाल खानची साक्ष का नोंदविण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्व साक्ष न नोंदविता सत्र न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यामुळे त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. त्याचवेळी या खटल्यातील एक साक्षीदार आणि सलमान खानचा तत्कालिन अंगरक्षक रविंद्र पाटीलच्या म्हणण्यानुसार सलमान खान त्या दिवशी अपघातापूर्वी वेगाने गाडी चालवत होता, मग अशावेळी जुहूतील हॉटेल मॅरिएट ते अपघातस्थळी पोहोचण्यासाठी लॅंडक्रुझरसारख्या गाडीला ३० मिनिटे कशी काय लागली, असाही तांत्रिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सदोष मनुष्यवधाच्या आरोपामध्ये हेतू स्पष्ट होणे आवश्यक असते. मात्र, सलमानच्या खटल्यामध्ये हेतू स्पष्ट करणारे कोणतेही पुरावे सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले नाहीत, यावरही बचाव पक्षाने बोट ठेवले.
वास्तविक हे सर्व मुद्दे मुंबई पोलीसांच्या तपासात स्पष्ट व्हायला हवे होते. अपघात घडला त्यावेळी गाडीमध्ये नेमके किती लोक होते. त्यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे का, गाडीचा वेग किती होता, त्या वेगाने संबंधित अंतर कापण्यासाठी किती वेळ लागू शकतो, याचा अभ्यास करून नोंद केली गेली का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मुंबई पोलीसांना तपासात का शोधली नाहीत, हे स्पष्ट होत नाही. याचाच फायदा सलमान खानला झाला आणि त्याला सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.