News Flash

रक्तसंसर्गामुळे १ हजार १३२ रुग्णांना ‘एचआयव्ही’ बाधा

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे.

वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणाचा परिणाम

एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील ‘एचआयव्ही’ आजाराचे प्रमाण नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरी रक्ताच्या संसर्गामुळे व वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणामुळे राज्यभरात अनेकांना ‘एचआयव्ही’ची बाधा होत आहे.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील आकडेवारीनुसार एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे. २०११-१२ या साली राज्यभरात असलेली ५४,२८९ एचआयव्हीबाधितांची संख्या २०१६-१७ पर्यंत २५,१२० पर्यंत घटली आहे. मात्र वैद्यकीय उपचारांमधील निष्काळजीपणामुळे रुग्णांना ‘एचआयव्ही’ची लागण होत आहे. गेल्या पाच वर्षांत रक्ताच्या संसर्गामुळे १,१३२ रुग्णांना ‘एचआयव्ही’ची बाधा झाली असल्याची गंभीर बाब माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत चेतन कोठारी यांनी समोर आणली आहे. सध्या रक्त तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या एलायझा पद्धतीत रक्तदानानंतर एचआयव्हीच्या विषाणूंचे तीन महिन्यांनंतर निदान होते. यासंदर्भात आपण राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाकडे तक्रार केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढय़ांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे कोठारी यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत सांसर्गिक सुई व इंजेक्शनच्या वापरामुळे ५८१ जणांना ‘एचआयव्ही’ची बाधा झाली आहे. तर गर्भवती मातेपासून ११,८४१ मुलांना ‘एचआयव्ही’ लागण झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ‘एचआयव्ही’ची आकडेवारी जास्त असली तरी महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी होत चालल्याचे आयसीटीसी (इंटिग्रेटेड कौन्सिलिंग अ‍ॅण्ड टेस्टिंग सेंटर)च्या अहवालातून पुढे आले आहे.

खर्चिक नॅट तपासणीच नाही

रक्ताच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एलायझा’ तपासणीत ‘एचआयव्ही’चे तात्काळ निदान होत नाही. ‘एलायझा’ तपासणीत तीन महिन्यांच्या (विंडो पीरिअड)कालावधीत एचआयव्हीचे निदान होते. त्यामुळे सध्या रक्ततपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एलायझा’ तपासणीपेक्षा अत्याधुनिक तपासणी सुरू करणे आवश्यक आहे व रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्याचा वैद्यकीय इतिहास, आजार आदी बाबींची विचारपूस केल्यानंतर रक्त घ्यावे, असे ‘थिंक फाऊंडेशन’च्या विनय शेट्टी यांनी सांगितले. सध्या मुंबईत अनेक खासगी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जाते. या तपासणीअंतर्गत एचआयव्हीचे निदान पहिल्या दहा दिवसांत होते. या तपासणीसाठी प्रत्येक युनिट रक्तामागे १००० रुपयांपर्यंत खर्च येतो. ही तपासणी खर्चीक असल्याने सरकारी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जात नाही, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 3:42 am

Web Title: hiv blood infection
Next Stories
1 दर्जेदार ‘प्रसादा’साठी मंडळांमध्ये जनजागृती
2 गुडघेरोपण शस्त्रक्रियांच्या नियम पालनावर नजर
3 मुलुंड ते कळवादरम्यान उद्या रात्री पाच तासांचा मेगाब्लॉक
Just Now!
X