जोडीदाराची गरज प्रत्येकाला असते, शारीरिक गरजांसाठी तसेच मानसिक पाठबळासाठीही.. एचआयव्हीसोबत जगणाऱ्या, जोडीदाराला गमावलेल्या, एकाकी पडलेल्या व्यक्तींना औषधांसोबतच मानसिक आधाराचीही गरज भासते. मात्र समाजापासून दुखणे दूर ठेवत असलेल्या एचआयव्हीबाधितांना जोडीदार शोधताना अनंत अडचणी येतात. त्यांची ही निकड लक्षात घेऊन महानगरपालिकेने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत शनिवारी वधू-वर मेळावा आयोजित केला आहे.
एचआयव्हीबाधितांच्या नवीन नोंदी होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजमितीला सुमारे ४५ हजार एचआयव्हीबाधित मुंबई व परिसरात आहेत. त्यातील २९,०३१ रुग्णांची एआरटी (अ‍ॅण्टि रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट) उपचारांसाठी नोंद करण्यात आलेली आहे. यापैकी १७,५२० पुरुष व ११,५११ स्त्रिया आहेत. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (नॅको) मार्गदर्शक तत्त्वानुसार शरीरातील प्रतिकारक्षमता विशिष्ट पातळीपेक्षा (सीडी४ संख्या ३५० खाली) कमी झालेल्या एचआयव्हीबाधितांचीच एड्सच्या वर्गवारीत नोंद होते व त्यांना एआरटी उपचार दिले जातात. या औषधोपचारांमुळे एचआयव्ही संसर्गित लोकांचे आयुष्यमान वाढले असून ते सामान्यांप्रमाणेच काम करू शकतात. मात्र एचआयव्हीबद्दल आजही समाजात नकारात्मकतेची भावना आहे. त्यामुळे हा आजार असलेले रुग्ण समाजापासून वेगळे पडतात. काही वेळा या आजारात जोडीदार गमावला जातो. लहान वयात आजार झाल्याने पुढचे संपूर्ण आयुष्य एकटय़ाने काढावे लागते. त्यामुळे त्यांना जोडीदार शोधण्यास पुण्याची पॉझिटिव्ह साथी ही संस्था काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने शहरातील पहिल्या वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी ६० पुरुष व ३५ महिलांनी नोंदणी केली आहे.
एचआयव्हीबाधितांनाही चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. समाजात त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांचा जोडीदार होण्यासाठी एचआयव्ही संसर्ग नसलेली व्यक्ती तयार होणे सध्या तरी अवघड दिसते आहे. अशा परिस्थितीत आपल्यासारखेच आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींशी त्यांची गाठभेट घालून द्यावी, या हेतूने हे व्यासपीठ दिले जात आहे. यात त्यांना जोडीदार सापडले तर आनंदच आहे, पण एकमेकांशी मैत्री झाली आणि मानसिक आधार मिळाला तरी आमचा हेतू सफल होईल, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालक आणि महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या. हा मेळावा शनिवारी होत असला तरी इच्छुकांना यानंतरही http://www.positivesathi.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
मुलांचे काय..
जोडीदाराचा शोध घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देताना मानसिक आधाराची गरज प्रामुख्याने अधोरेखित केलेली आहे. जोडीदार कोणत्याही वयात निवडता येतो. शारीरिक संबंधांसोबतच मानसिक आधार ही एचआयव्हीबाधितांची प्रमुख गरज आहे. यासाठी जोडप्याचे समुपदेशन केले जाणार आहे. संसर्ग असलेले मूल जन्माला येऊ नये, अशीच आमची भूमिका आहे. मात्र प्रत्येक एचआयव्हीबाधितासाठी स्थिती वेगळी असते. काही वेळा मूल होऊ देणे शक्य असते. मुलामध्ये या आजाराचा संसर्ग होणार नाही, याची खात्री डॉक्टरांनी दिल्यानंतरच हा पर्याय स्वीकारता येईल, असे डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या.