|| शैलजा तिवले सुमारे पाच हजार जणांची तपासणी जागतिक एड्स दिनानिमित्ताने १ ते ७ डिसेंबर काळात मुंबईत राबविलेल्या ‘नो युवर स्टेटस’ या मोहीमेअंतर्गत ३० एचआयव्हीचे रुग्ण आढळलेत. एचआयव्ही या आजाराविषयीची तेढ दूर करून शहरातील सुमारे पाच हजार लोकांनी पुढाकार घेऊन याची निदान चाचणी करून घेतली. एड्स या आजाराविषयी नकारात्मक दृष्टिकोन असल्याने याची चाचणी करणे टाळले जाते. हा दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशाने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने (एमडॅक्स) ‘नो युवर स्टेटस’ या मोहिमेअंतर्गत खुलेपणाने चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनी शहरातील पालिका आणि सरकारी अशा २२ रुग्णालयांमध्ये १८७८ लोकांनी एचआयव्हीची चाचणी केली. यात ११ संशयित रुग्ण आढळलेत. शहरातील दादर आणि सीएसटी स्थानकांवर ३ ते ७ डिसेंबर काळात एमडॅक्सने एचआयव्हीची चाचणी मोफत उपलब्ध केली होती. या काळात ३०५७ लोकांनी चाचणी करून घेतली असून १८ संशयित रुग्ण निदर्शनास आले. तसेच याच काळात मेट्रोपोलिसच्या प्रयोगशाळांमध्ये ५० रुपयांत ही चाचणी उपलब्ध होती. शहरातील ५४ व्यक्तींनी या ठिकाणी चाचणी केली. यातून चार संशयित रुग्ण आढळले. यातील ३३ संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी त्यांच्या घराजवळील केंद्रामध्ये पाठविले होते. यातील ३० रुग्णांना एचआयव्ही असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले. उर्वरित तीन रुग्णांच्या चाचण्या अजूनही सुरू आहेत. या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्येने पुरुष आहेत. यातील तीन रुग्णांना आधीपासूनच एचआयव्ही असल्याची माहिती होती. या सर्व रुग्णांवर उपचारही सुरू झालेत, अशी माहिती एमडॅक्सच्या डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली. मुंबईत प्रथमच एवढय़ा मोठय़ा पातळीवर एचआयव्ही चाचणी होत असून यातून निदान वेळीच झाल्याने उपचारही वेळेत सुरू करणे शक्य झाले. पुरुषांबरोबर महिलाही ही चाचणीसाठी पुढे येत असल्याचेही पुढे डॉ. आचार्य यांनी व्यक्त केले. पेट्रोल पंप, रेल्वे स्थानकांवर मोफत चाचणी ११ डिसेंबर म्हणजे आजपासूनच एमपीसीएलच्या २१ पेट्रोलपंपावर एचआयव्ही चाचण्या होणार आहेत. पंपावर मोठय़ा संख्येने येणाऱ्या वाहन चालकांची तपासणी होईल. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी आणि दादर या रेल्वे स्थानकांवर १० ते १७ डिसेंबर काळात मोफत एचआयव्ही करता येईल.