‘कसाबला सोडा, अन्यथा विमानाचे अपहरण करेन’ अशी धमकी देऊन खळबळ उडवून देणाऱ्या विकास यादव या तरुणास ‘सुस्का’ विशेष न्यायालयाने १५ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
२२ ऑक्टोबर २०१२ रोजी जेट एअरवेजच्या नियंत्रण कक्षात एक निनावी दूरध्वनी आला होता. अजमल कसाबला सोडा, अन्यथा तुमच्या मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाचे अपहरण केले जाईल, असे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. सहा महिन्यांच्या कालावधीत जेट एअरवेजला तीनदा असे फोन आले होते. त्याप्रकरणी सहार विमानतळ आणि साकीनाका पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल होते.  
गुन्हे शाखा ८ च्या पथकाचे प्रमुख दीपक फटांगरे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून गुजरातमधून विकास यादवला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ५ मोबाईल आणि सीम कार्ड जप्त केले. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १५ महिन्यांचा तुरूंगवास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.