दुष्काळामुळे  प्रतीकात्मक पद्धतीने धुळवड साजरी करण्याची सूचना

महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी धुळवडीला पाणी वाया घालवू नका, धुळवड न खेळता पाणी वाचवा, असे आवाहन ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ट्विटर’ या सारख्या  समाज माध्यमांवरुन केले जात आहे. या संदर्भातील विविध संदेश माध्यमातून सध्या फिरत असून त्यामुळे ‘पाणी वाचवा’ मोहिमेला सोशल मिडियाचेही पाठबळ मिळाले आहे. तर काही संदेशांमध्ये ‘धुळवड आणि रंगपंचमी पाणी व रंगाशिवाय साजरी करा’ असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहरासह अनेक मोठय़ा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. काही तलाव, धरणांमध्ये मे महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल इतकच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. जून महिन्यात पाऊस वेळेवर सुरु झाला नाही तर आणखी भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. कोकण विभागातील तलाव, धरणांमध्ये अवघा ४० टक्के इतकाच साठा शिल्लक असून तो मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंतच पुरणार आहे. मराठवाडय़ात ६ टक्के, पुण्यात २२ टक्के तर विदर्भात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ‘धुळवड खेळू नका पाणी वाचवा’, असे एका संदेशात म्हटले आहे.

वर्षांचे ३६५ दिवस पाणी वाचवा, यंदा रंगांनी धुळवड खेळूच नका तर प्रत्येकाच्या कपाळाला केवळ कुंकवाचा/गुलालाचा टिळा लावून प्रतिकात्मक धुळवड साजरी करा, असे आवाहनही या संदेशातून करण्यात आले आहे.

बचतीच्या सूचना

  • जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवा, म्हणजे जास्तीचे जमा केलेले व न वापरलेले पाणी ओतून देण्याचा प्रश्नच येणार नाही
  • ताजे पाणी आणि शिळे पाणी ही संकल्पना मनातून काढून टाका
  • होळीत झाडे जाळण्याऐवजी किमान एक तरी झाड लावण्याचा संकल्प करा