उल्हासनगर-अंबरनाथ रेल्वेमार्गावर रेल्वे रुळाखाली दहा-बारा फुटाचा खड्डा पडल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळाखाली पडलेला खड्डा भरण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. कर्जत-कल्याण वाहतूक आणि सीएसटीकडे जाणा-या येणा-या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मध्यरेल्वे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. तर कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या कल्याण स्थानकातूनच मुंबईकडे पुन्हा वळविण्यात आल्या आहेत. कल्याण – कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प पडल्याने पुण्याच्या दिशेने जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा – पनवेल – कर्जत मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न रेल्वेप्रशासन करीत आहे. मात्र, यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप सांगता येत नाही.
पुणे इंटरसिटी, विशाखापट्टणम एक्सप्रेस, पुणे डेक्कन, सीएसटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेस, एलटीटी-हुबळी, कोयना एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.