राज्य शासनाने टाळेबंदीच्या काळात घरपोच मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार १५ मे ते २१ जून या काळात २० लाख ५० हजार  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. रविवारी एका दिवसात ६६ हजार ५७० ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्यात १५ मेपासून घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली.

राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीपैकी ८,२२२ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल ते १७ जून २०२० या काळात १ लाख ३८ हजार ४६ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख ३२ हजार ७०६ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहेत.

ऑनलाइन मद्यपरवाना

ऑनलाइन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन तसेच आयओएस प्रणालीद्वारे ऑनलाइन परवाने घेऊ शकतात. कोणाला ऑनलाइन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक, निरीक्षक व दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे उमाप यांनी सांगितले.