नवनवीन संकल्पना राबविण्याचा तरुणांचा प्रयत्न

मुंबई : करोनाकाळात खिशाला लागलेला चाप आणि वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी यामुळे गणेशोत्सवाची बाजारपेठ थंड आहे. एकीकडे मखर, सजावटीचे साहित्य, फूलविक्रेते आर्थिक विवंचनेत असतानाच मुंबईतील तरुणांनी घरपोच मखर देऊन त्यात रोजगार संधी शोधली आहे. शिवाय थर्माकोलला पर्यायी आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरून विविध संकल्पना मखरातून साकारण्यात आल्या आहेत.

इरकल साडीपासून मखर साकारणारा संदेश गावकर याने ऑनलाइन मखरविक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. साडीचा पडदा, रेशमी लोड, आयदानाच्या टोपलीचे छत्र असे पारंपरिक

आणि पर्यावरणपूरक मखर दरवर्षी ३७०० रुपयांना विकले जात होते; परंतु यंदा अवघ्या २८०० रुपयांत ते उपलब्ध आहेत. यानिमित्ताने लाकूडकाम, शिवणकाम, वेल्डिंग, टोपली विणणारे अशा अनेकांना रोजगार मिळाला आहे.

‘टाळेबंदीमुळे अधिकचे पैसे देऊन कच्चा माल खरेदी करावा लागला. पण हा काळ कमावण्यापेक्षा लोकांना सेवा देण्याचा आहे या उद्देशाने आव्हान स्वीकारले,’असे संदेश गावकर यांनी सांगितले. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांचा वापर या तरुणांकडून केला जात आहे. लालबाग येथील अभिषेक साटम याने कागदाची करामत करून मखर साकारले आहेत.

संकल्पनेनुसार पत्रावळ, कापडी झालरीचाही वापर केलेला आहे. अंदाजे दोन हजारापासून या मखरांच्या किमती आहेत. अभिषेक

घरपोच सेवाही देतो. भांडुप येथील देवेंद्र रेडीज आपल्या चित्रकलेचा वापर करून गणेशमूर्तीला साजेशी कॅनवास पेंटिंग करत आहे. तर ज्यांना टिकाऊ मखर हवे आहेत त्यांच्यासाठी डिजिटल माध्यमातून चित्र आणि सुलेखन सनबोर्डवर छपाई करून मखर स्वरूपात दिले जात आहे. एक हजार रुपयांपासून या मखरांची विक्री होत असून चित्रानुसार वाढीव दर आहेत.

कसा संपर्क कराल?

फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर या तरुणांनी आपल्या कामाची विशेष प्रसिद्धी केली आहे. इरकल साडय़ांच्या मखरासाठी संदेश गावकर ९८६९४३८११८, कागदी मखरांसाठी अभिषेक साटम ९८७०७४२५९८, तर डिजिटल चित्रमखरासाठी देवेंद्र रेडीज ७७१०९४७६४५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.