करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थ घरोघरी पोहोचविण्यास विविध ऑनलाइन सेवांना परवानगी देण्यात आली आहे. अन्नपदार्थ घरी पोहोचवणारे कर्मचारी २४ तास कार्यरत राहू शकतील. तसेच या काळात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. नवे आदेश मुंबई महापालिका आणि ठाणे पालिकेने बुधवारी दिले.

राज्याच्या प्रमुख सचिवांच्या उपस्थितीत सर्व महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बुधवारी आयोजित करण्यात आली होती. शनिवार आणि रविवारी लागू असणाऱ्या संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक उपाय योजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आठवडाअखेरचे दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार असून या काळात नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन अन्नपदार्थ आणता येणार नाहीत. मात्र अन्नपदार्थांच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे. स्विगी, झोमॅटे यांसह विविध सेवा संचारबंदीच्या काळात २४ तास सुरू ठेवता येतील. त्याचबरोबर आठवडाअखेरच्या संचारबंदीत मुंबईतील रस्त्यालगतच्या फळांसह अन्य दुकानावरून खाद्यपदार्थ घरी घेऊन जाता येतील. पण तेथे उभे राहून पदार्थ खाता येणार नाहीत, असे नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध आजाराने ग्रस्त रुग्णांची सुश्रूशा करणाऱ्या व्यक्ती, घरकाम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंपाकी, वाहनचालक, परिचारिका आणि वैद्यकीय मदतनीस यांना आठवडाभर सकाळी ७ ते रात्री १० या काळात ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार नेत्रचिकित्सा करणारे दवाखाने, तसेच चष्म्यांची दुकाने नियोजित वेळेत खुली राहणार आहेत.

परीक्षार्थींना दिलासा

आठवडाअखेरच्या संचारबंदीच्या काळात स्पर्धा परीक्षा किंवा अन्य परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा उमेदवारांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच या विद्यार्थ्यांसोबत एकाच पालकाला परीक्षा केंद्रावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे.