राज्यात टाळेबंदी असतानाही, मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर १५ ते ३१ मे या कालावधीत ६ लाख ६८ हजार ६४५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली, तर महिनाभरात एक लाखाहून अधिक नवीन मद्यसेवनाचे परवाने मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावर होऊ लागला. त्यामुळे काही अटी व शर्तीवर घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली. १५ ते ३१ मे  या काळात ६ लाख ६८ हजार ६४५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. एका  दिवसात ६३ हजार ९६२  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. यापैकी मुंबईत ४१ हजार ५३४ ग्राहकांना मद्यविक्री करण्यात आली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी ७ हजार २०७ अनुज्ञप्ती सुरू आहेत. संकेतस्थळावर ऑनलाइन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार १ ते ३० मे या काळात १ लाख ८ हजार ८५ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्रात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली. कारवाईत १७३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३४ लाख ३६  हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.