व्याजदर वाढणार; मासिक हप्त्याचाही वाढता भार

मोदी सरकारच्या कालावधीतील पहिली व्याज दरवाढ लागू करताना रिझव्‍‌र्ह बँकेने गृहादी कर्जदारांना ‘बुरे दिन’ची अनुभूती बुधवारी दिली. बँकांसाठीचे व्याज महाग करतानाच मध्यवर्ती बँकेने सामान्यांचेही गृह, वाहन आदी कर्जासाठीचा मासिक हप्ताही वाढविण्याची तरतूद दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणाच्या माध्यमातून करून ठेवली.

गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या ऐतिहासिक तीन दिवसांच्या पतधोरण बैठकीत रेपो दर (बँकांसाठी लागू व्याजदर) पाव टक्क्याने वाढवत तो ६.२५ टक्क्यांवर नेऊन ठेवला. विशेष म्हणजे पतधोरण समितीच्या सर्वच, सहा सदस्यांनी घसघशीत व्याज दरवाढीच्या बाजूने कौल दिला. तसेच रिव्हर्स रेपो दरही याच प्रमाणात उंचावत तो सहा टक्के केला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या जानेवारी २०१४ नंतरच्या या पहिल्याच व्याज दरवाढीच्या घावामुळे ऑगस्ट २०१७ पासून स्थिर असलेले दरही आता झेपावू लागले आहेत. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँकेने गेल्याच आठवडय़ात ठेवींवरील दरांबरोबरच कर्ज व्याजदरही वाढविले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारच्या निर्णयामुळे अन्य व्यापारी बँकांनाही त्यांच्या कर्जदारांचा मासिक हप्ता वाढविण्याचे निमित्त आगामी कालावधीत मिळणार आहे.

वार्षिक ७.४ टक्के स्थिर विकास दराबरोबरच चालू वित्त वर्षांत महागाईचा दर ४.५ टक्क्यांपुढे राहण्याची भीती व्यक्त करत रिझव्‍‌र्ह बँकेने व्यापारी बँकांसाठी लागू रेपो दर तसेच रिव्हर्स रेपो दरही पाव टक्क्यापर्यंत वाढविले. यामुळे व्यापारी बँका कर्जदारांसाठीचा व्याज दर ०.१० ते ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शक्यता असून यामुळे गृह, वाहन आदी कर्जदारांचा मासिक हप्ता आणखी वाढणार आहे.

दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारच्या व्याज दरवाढीचे भांडवली बाजाराने मात्र स्वागत केले असून बुधवारी गेल्या सलग तीन सत्रातील घसरण मोडून काढली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्थेत सुधार दिसून येत आहे. पण त्याचबरोबर भारतात गुंतवणूक, पायाभूत क्षेत्रावरील खर्च वाढत आहे. खनिज तेलाच्या दरातील अस्थैर्य तसेच घरभाडे भत्ता याचा महागाईवरील दबाव येत्या कालावधीत कायम राहण्याची शक्यता आहे.   – ऊर्जित पटेल,  गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक