आधीच बोकाळलेली महागाई आणि त्यात वाढलेले व्याजदर यामुळे गृहकर्ज कसे घ्यायचे, या विवंचनेत असलेल्या सर्वसामान्यांना रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी दिलासा दिला. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी अपेक्षेप्रमाणे रेपो दरात पाव टक्का कपात केली आहे. तब्बल नऊ महिन्यांनंतर प्रथमच रेपो दर कमी केल्याने आता बँकांनीही आपल्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
राष्ट्रीयीकृत आयडीबीआयने तर सायंकाळीच आपल्या आधार दराबरोबरच (बेस रेट) ठेवी दरही एक फेब्रुवारीपासून पाव टक्क्याने कमी करण्याची घोषणा करून टाकली. तर याचा अप्रत्यक्ष लाभ होणाऱ्या बांधकाम क्षेत्रानेही यामुळे घरांची मागणी वाढण्याची आशा वर्तविली आहे.
एप्रिल २०१२ नंतर प्रथमच रेपो दरात पाव टक्का कपात करत रिझव्‍‌र्ह बँकेने हा दर ७.७५ टक्के केला आहे. मध्यवर्ती बँकेकडून उचलाव्या लागणाऱ्या या रकमेवर द्यावे लागणारा हा दर आता कमी केल्याने अन्य वाणिज्य बँकांनाही त्यांचे गृह, वाहन आदी कर्ज कमी दरांमध्ये उपलब्ध करून देता येईल. सध्या १० टक्क्यांच्या आसपास असणारा आधार दर कमी करून बँका या निर्णयाची अंमलबजावणी करतील. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी बँकेकडून कर्जाचे व्याजदर लवकरच कमी केले जातील, असे संकेत दिले आहेत. तर आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी कर्जदारांच्या मासिक हप्त्यात मोठी घट दिसून येईल, असे नमूद केले. दरकपातीमुळे घरांची मागणी वाढेल, अशी आशा बांधकाम विकासकांनी व्यक्त केली आहे.

मार्चनंतरच महागाई कमी
देशाचा आर्थिक विकासदर ५.८ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर खुंटविताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मंगळवारी जारी केलेल्या तिमाही पतधोरणात मार्च २०१३ अखेर महागाई मात्र कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला. वाणिज्य बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेकडे ठेवावे लागणाऱ्या ठेवीतील हिस्सा अर्थात रोख राखीव प्रमाण (सीआरआर) पाव टक्क्याने कमी करण्यात आल्याने बँकांकडे अतिरिक्त १८,००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.