मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांना तीन वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात या तरुणांना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याच्या अखत्यारीतील दहशतवादविरोधी पथकाने पकडले होते व त्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतानाच कारवाईचे समर्थनही केले होते.
निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या तुष्टीकरणाकरिताच पवार यांनी या वादग्रस्त मुद्दय़ाला स्पर्श केल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अल्पसंख्याक समाजात राष्ट्रवादीबद्दल आपुलकी नाही. ठराविक विभाग वगळल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदानही होत नाही. हे चित्र बदलण्यासाठीच पवार यांनी प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे. काँग्रेससह आघाडीत अल्पसंख्याकांची पारंपरिक मते राष्ट्रवादीला मिळतात. पण राष्ट्रवादीची म्हणून अल्पसंख्याकांची व्होट बँक होऊ शकलेली नाही. यासाठीच त्यांची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून अल्पसंख्याक समाजात संदेश देण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे.
अल्पंसख्याक तरुणांना पोलिसांकडून नेहमीच नाहक त्रास दिला जातो, अशी तक्रार आपण वारंवार केली होती. पण गृहमंत्री पाटील यांनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता पवार बोलल्याने तरी त्यांच्या भूमिकेत बदल होईल, असे काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले. पवार यांनी या संवेदनशील मुद्दय़ाला स्पर्श केल्याने काँग्रेसमध्ये मात्र सावध प्रतिक्रिया आहे.

मालेगाव स्फोटप्रकरणी अल्पसंख्याक  तरुणांना पोलिसांनी अटक करून ‘मोक्का’ लावला. तेव्हा पोलिसांच्या या कृतीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जोरदार समर्थनही केले होते. या अटकेबद्दल टीका सुरू होताच ही कारवाई कशी बरोबर आहे हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. हिंदुत्ववादी संघटनेचे नेते असिमानंद यांच्या जबाबानंतर सारे चित्र बदलले. मग या तरुणांच्या सुटकेची मागणी होऊ लागली.