मुद्रांक शुल्कातील कपातीचाही परिणाम

मुंबई : करोनामुळे बांधकाम उद्योगाला मोठा फटका बसला. मात्र, शिथिलीकरणानंतर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीला वेग येऊ लागला आहे. त्यातही सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत २४ ऑक्टोबपर्यंत मुंबईत सहा हजार १९ तर राज्यात एक लाख एक हजार घरांची विक्री झाल्याचे राज्याच्या नोंदणी व महानिरीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे घरविक्रीला वेग आला असला तरी राज्याच्या महसुलात मात्र घट झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांत घरविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत राज्यात घरविक्रीद्वारे ७०७ कोटींचा, तर मुंबई १७७ कोटी महसूल प्राप्त झाला. सप्टेंबर महिन्यात राज्यात एक लाख १९ हजार ८४४, तर मुंबईत पाच हजार ५९७ घरखरेदीचे दस्तावेज नोंदले गेले. मे महिन्यात ही संख्या मुंबईत फक्त २०७  इतकी होती. मात्र जून (१८३९), जुलै (२६६२), ऑगस्ट (२६४२) या तीन महिन्यांत जितके घरखरेदीचे दस्तावेज नोंदले गेले त्यापेक्षा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येते. मुद्रांक शुल्क कपातीमुळे दस्तावेज नोंदणीसाठी गर्दी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अलीकडेच ‘अ‍ॅनारॉक प्रॉपर्टीज कन्सल्टंट’ या सर्वेक्षण कंपनीने जाहीर केलेल्या तिमाही अहवालानुसार जानेवारी ते सप्टेंबर या काळात मुंबई महानगर परिसरात ४९ हजार ३१३ कोटी रुपयांची घरविक्री झाली. २०१९ मध्ये ६२ हजार ९६४ कोटी रुपयांची घरविक्री झाली होती. त्या तुलनेत ही कमी असली तरी टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ती खूप सकारात्मक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील सात शहरांत या काळात ८८ हजार ७३० कोटींची घरविक्री झाली. त्यामध्ये एकटय़ा मुंबई महानगर परिसराचा वाटा ५५ टक्के असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या नऊ महिन्यांत पुणे परिसरात आठ हजार ६९२ कोटी किमतीच्या घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ५० टक्के आहे. यंदा १४ हजार २०० घरे विकली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील नोंदणीच्या तुलनेत यंदा घरविक्रीची नोंदणी ३८ टक्कय़ांनी वाढल्याचेही हा अहवाल सांगतो. गेल्या तिमाहीच्या तुलनेत मुंबई महानगर तसेच पुण्यात घरविक्री चांगली झाली. मुंबई महानगर परिसरात गेल्या तिमाहीत सहा हजार ७४८ कोटी रुपये घरविक्रीतून प्राप्त झाले. यंदाच्या तिमाहीत त्यात १४५ टक्के वाढ होऊन १६ हजार ५०० कोटी विकासकांच्या तिजोरीत जमा झाले. पुण्यात ही वाढ १२५ टक्के होती, असेही या अहवालात नमूद आहे.

रोकडसुलभता.. : आर्थिक चणचणीत असलेल्या विकासकांना या निमित्ताने त्यांच्याकडील रिक्त घरांचा साठा निकाली निघत असल्यामुळे रोकडसुलभता निर्माण होणार आहे. त्यातच दसरा आणि दिवाळी या सणाच्या वेळी आणखी वाढ होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे, असे मत अ‍ॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे चेअरमन अनुज पुरी यांनी व्यक्त केले आहे.