१ ऑगस्टपासून मोहीम; राज्य सरकार-पालिकेची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई : अंथरुणाला खिळलेल्या वा आजारपणामुळे घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठी येत्या १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. पुण्याऐवजी मुंबईतून ही मोहीम सुरू करण्यात येणार असून या नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाईल, अशी माहिती राज्य सरकार व पालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

वारंवार सूचना करूनही केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने मात्र वेळीच याबाबत पुढाकार घेतल्याने अशा नागरिकांचे लसीकरण दृष्टिपथात दिसत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.

घरोघरी लसीकरणाला पुण्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्याची ग्वाही राज्य सरकारने यापूर्वी दिली होती. परंतु त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे तयार न केल्याने तसेच मोहिमेला प्रसिद्धी न दिल्याने न्यायालयाने सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी घरोघरी लसीकरण मोहिमेच्या धोरणाचा प्रारूप मसुदा राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सादर केला. या मोहिमेला मुंबईतून चांगला प्रतिसाद मिळाला असून अंथरुणाला खिळलेल्या आणि घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या मुंबईतील तीन हजार ५०५ नागरिकांच्या नातेवाईकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून मुंबईतून ही मोहीम राबवण्यात येईल. याबाबतचे धोरण लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असेही कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. पहिल्या आठवड्यात या मोहिमेत कसा प्रतिसाद मिळतो याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सरकार व पालिकेला दिले.

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. राज्यात मंगळवारी दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर आतापर्यंत चार कोटी २४ हजार ७०१ लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. देशामध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. पहिली लस मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख ९९ हजार ३३९, तर दुसरा मात्रा घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ एवढी आहे.

पहिली मात्रा घेतलेल्यांनाही लाभ

अंथरुणाला खिळलेल्या तसेच ज्या आजारी नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यांनाही या मोहिमेचा लाभ देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर अशा नागरिकांचाही मोहिमेत समावेश करण्यात आला असून ही मोहीम शासकीय आणि पालिका रुग्णालयांतर्फे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे हे लसीकरण मोफत असल्याचे सरकारतर्फे  न्यायालयाला सांगण्यात आले. सरकारच्या धोरणानुसार पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या, आजारपणामुळे घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल.