होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. या आदेशामुळे होमिओपॅथी-आयुर्वेदिक डॉक्टरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.  
सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अभय ओक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली. याबाबतचा सविस्तर लेखी आदेश महिन्याभरात दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी उपचारास परवानगी देण्याबाबत  ‘महाराष्ट्र होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशनर्स अ‍ॅक्ट व महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल अ‍ॅक्ट’मध्ये दुरुस्ती केली होती.