मुंबईवरील २६-११ च्या अतिरेकी हल्ल्याचा अतिशय जोखमीचा तपास करुन पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला फासावर लटकावण्यास सहाय्यभूत ठरलेल्या ४६ पोलिस अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सन्मानास पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया व विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती या दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच राजीनामा देऊन पोलिस दलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेले वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश महाले हे एक लाख रुपयांच्या बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्याने सारा देश हादरला होता. त्यावेळी पोलिसांनी प्राणाची बाजी लावून अजमल कसाब या एका अतिरेक्याला जिवंत पकडले होते. त्यामुळे भारताला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगाच्या वेशीवर टांगता आला. या हल्ल्याच्या संदर्भात विविध पोलिस ठाण्यांमध्ये १२ गुन्हे दाखल करण्यात आले होते.  त्याच्या तपासाची जबाबदारी मुंबई गुन्हे अन्वेषण विभावर सोपविण्यात आली होती. त्यात राकेश मारिया, देवेन भारती, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक दराफे (सध्या निवृत्त) व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश महाले यांच्यासह ३० अधिकाऱ्यांचा व १४ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा अत्यंत अवघड, आव्हानात्मक, जोखमीचा तपास या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळून केला व ९० दिवसांच्या आत ११७५० कागतपत्रांचा अंतरिम अहवालही न्यायालयात सादर केला. दुसऱ्या टप्प्यात १५०० कागपत्रांचा पुरवणी तपास अहवाल सादर केला. ६५९ साक्षीदारांचे पुरावे सादर केले. त्या आधारावर सत्र न्यायालयाने कसाबला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्यामुळेच मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही कसाबची मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली. अखेर त्याला फासावर लटकावण्यात आले.
मुंबईवरील हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार राकेश मारिया, देवेन भारती व अशोक दराफे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर वरिष्ठ पोलिस निरिक्षक महाले एक लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. पोलिस निरीक्षक प्रशांत मर्दे यांना ४० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. त्याशिवाय इतर अधिकाऱ्यांना ५ हजारापासून ४० हजार रुपयांपर्यंत एकूण ६ लाख ५८ हजारस रुपयांची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत.