डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सामाजिक अस्पृश्यता संपविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विचारावर प्रगाढ श्रद्धा असणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा. सू. गवई यांनी सर्वसमावेशक राजकारण केले, तो विचार घेऊन राजकारणातील अस्पृश्यता संपविण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रिपब्लिकन नेते व माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे संजय राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, समाजवादी पक्षाचे अबू असिम आझमी, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, भूपेश थूलकर, भाजपच्या नेत्या जयवंतीबेन मेहता, खासदार भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवरांनी गवई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून त्यांना आदरांजली अर्पण केली. या वेळी गवई यांचे पुत्र व रिपब्लिकन नेते डॉ. राजेंद्र गवई व त्यांचा परिवार उपस्थित होता. मुख्यमंत्री आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आकर्षित करणारे रा. सू. गवई यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी उभी केलेली नागपूरमधील दीक्षाभूमी एक पवित्र स्थळ तर आहेच, परंतु तो देशातील वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. आज राजकारणात अस्पृश्यता पाळली जात असल्याचे पाहायला मिळते. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सामाजिक अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गवई यांनी राजकाणातील अस्पृश्यता संपवण्याचा प्रयत्न केला. तो विचार घेऊन सर्वसमावेशक राजकराण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. राज्य सरकारच्या वतीने रा. सू. गवई यांचे उत्तम स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. शरद पवार यांनी आपल्या भाषणात गवई यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
केवळ दलितांच्या प्रश्नांवर नव्हे तर देशउभारणीत इतर क्षेत्रातील बाबासाहेब आंबेडकरांचे किती मोठे योगदान होते, हे आम्हाला गवई यांच्याबरोबर चर्चा करताना समजायचे.  वीज निर्मिती व नॅशनल ग्रीड उभारण्यासंबंधी त्यांनी त्या वेळी मांडलेले विचार आजही महत्त्वाचे वाटतात, अशा शब्दांत त्यांनी गवई यांना श्रद्धांजली अर्पण केली.