दहा पक्षांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपशी टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य छोटय़ा-मोठय़ा राजकीय पक्षांची मोट बांधून महाआघाडी उभी करण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे.

तीन राज्यांतील विजयामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसलाही नैतिक बळ मिळाले आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा पराभव करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यातून फडणवीस सरकारची ‘घरवापसी’ अटळ आहे, असा दावाही त्यांनी केला. परंतु आघाडीत सहभागी करून घेण्यात येणाऱ्या पक्षांच्या मागण्या पूर्ण करणे, विशेषत जागा वाटपात सर्वाचे समाधान करणे, यात काँग्रेसची कसोटी लागणार आहे.

काँग्रेसने विभागवार, जिल्हावार राजकीय स्थितीचा आढावा घेतला आहे. लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीबरोबर झालेल्या चर्चेतून लोकसभेच्या जवळपास ४० जागांवर मतैक्य झालेले आहे. मात्र, अन्य पक्षांचे समाधान करून भाजपविरोधात एकच आघाडी उभी करण्याची मोठी कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे.

‘जागावाटपाबाबत चर्चा सुरू’

केंद्रात सत्ता परिवर्तन करायचे असेल, तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागेल, असे चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटपाबाबत समाधानकारक चर्चा होत आहे. एकदोन जागांच्या अदलाबदलीचा प्रश्न आहे, तो सोडविला जाईल. अन्य पक्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले व्यतिरिक्त अन्य काही जागांची मागणी केली आहे, माकपला दिंडोरीतून लढायचे आहे. भारिप बहुजन महसंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारा जागा मागितल्या आहेत. या सर्वच पक्षांच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी सुरू आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.