२६ जानेवारीच्या संचलनात सहभाग

पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांंनी पुन्हा अश्वदळाचा (माऊंटेड पोलीस युनिट) समावेश करण्यात येत आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभातील संचलनात हे पथक सहभागी होणार आहे. पोलीस सेवेत दाखल होणारे हे अश्वदळ वाहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी गस्त, समुद्रकिनारी चौपटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी गस्त, नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी व्यक्त केला. आवश्यकता पडल्यास पुणे, नागपूर आदी शहरांतही अश्वदळ सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांनी शिवाजी पार्क येथे रविवारी अश्वदळाची पाहणी केली. मुंबई पोलीस दल हे उत्कृष्ट पोलीस दल असून बदलत्या काळाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मुंबई पोलिसांनी केला आहे असे सांगून गृहमंत्री म्हणाले, यापूर्वी अश्वदळातील पोलिसांची गस्त होती. परंतु, वाढत्या वाहनांमुळे डिसेंबर १९३२ मध्ये ‘माऊंटेड पोलीस युनिट’ बंद करण्यात आले. आत्ता मुंबई पोलीस दलात अत्याधुनिक वाहने, वेगवान मोटारसायकली आहेत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी गुन्हे नियंत्रण ठेवण्यासाठी अश्वदळ अधिक प्रभावी ठरेल, या दृष्टिकोनातून ते पुन्हा कार्यरत करण्यात येत आहे.

* अश्वदळात ३० अश्व, एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक उप निरीक्षक, चार पोलीस हवालदार आणि ३२ पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

* सध्या या युनिटमध्ये देशी व विदेशी १३ जातिवंत अश्व खरेदी करण्यात आले असून उर्वरित अश्व पुढील सहा महिन्यात खरेदी करण्यात येणार आहेत.  गेल्या चार महिन्यांत या पोलीस कर्मचाऱ्यांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

* रेसकोर्स, हौशी रायडिंग क्लब आणि लष्कराच्या घोडदळातील ६१ अनुभवी प्रशिक्षकांनी अश्वदळातील पोलीस अंमलदारांना घोडे पाळण्याची कार्यपद्धती व कौशल्याचे प्रशिक्षण दिले आहे.

मुख्यालयावर पुन्हा रेजिमेंटल फ्लॅग

मुंबई पोलीस दलाला १९५४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते रेजिमेंटल फ्लॅग (कलर) पहिल्यांदाच बहाल करण्यात आला होता. या ध्वजाचा वापर गेली काही वर्षे करण्यात येत नव्हता. आता हा ध्वज यापुढे मुंबई पोलीस दलाच्या मुख्यालयात व विविध सशस्त्र दलांच्या मुख्यालयांमध्ये झळकणार आहे. ध्वजाची प्रतिकृती आयुक्त कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार असून हा ध्वज गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस दलाकडे सुपूर्द केला.