लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीचा बाग) नव्या वन्य पाहुण्यांचे आगमन होत आहे. भविष्यात या वन्यप्राण्यांची देखभाल आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास तिथल्या तिथेच उपचार करता यावेत यासाठी राणीच्या बागेत लवकरच सुसज्ज असे प्राण्यांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग, उपचार कक्ष, क्ष-किरण विभाग, प्रयोगशाळा, पिंजरे आदींचा समावेश असणार आहे.

भायखळ्यातील राणीच्या बागेत आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत देश-विदेशातील विविध प्रकारचे प्राणी व पक्षी राणीच्या बागेत दाखल होत आहेत. गेल्या वर्षभरात उद्यानात वाघाची जोडी, तरस असे वन्य प्राणी दाखल झाले आहेत. तर येत्या काळात मगर, सुसर, सिंह, झेब्रा, अस्वल असे आणखी प्राणीही राणीच्या बागेत दाखल होणार आहेत. या प्राण्यांच्या प्रकृतीची काळजी घेता यावी यासाठी उद्यानाच्या आवारातच रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वन्यप्राणी आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करता यावेत याकरिता हे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली. या वन्यप्राण्यांना कु ठेही बाहेर नेण्याची परवानगी नसते. त्यामुळे डॉक्टरांना उद्यानात बोलावून त्यांच्यावर उपचार करावे लागतात. मात्र रुग्णालय असल्यास या प्राण्यांना २४ तास निरीक्षणाखाली ठेवणे, शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, असेही त्रिपाठी म्हणाले.

विविध स्थापत्य कामे

प्राण्यांच्या रुग्णालयाबरोबरच मगर आणि घरीयालस माकड यांच्यासाठी अधिवास तयार करणे, सुरक्षारक्षकांची चौकी तयार करणे अशी विविध स्थापत्य कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पक्ष्यांसाठी विलगीकरणाची सोयही करण्यात येणार आहे. नवीन पक्षी किं वा प्राणी आणल्यानंतर काही काळ त्यांना वेगळे ठेवले जाते. त्यासाठी ही सुविधा करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी अंदाजित ५० कोटी रुपये खर्च येणार असून या कामांसाठी प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत.