रुग्णांच्या नातेवाईकांना फसविण्याचे वाढते प्रकार; एक टोळी जेरबंद

मुलीला सतत येणाऱ्या आकडीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी शहरातील नामांकित रुग्णालयात ते आले होते. चाचण्या केल्यानंतर अहवालाची वाट रुग्णालय परिसरात बसले असतानाच भामटय़ांनी त्यांना घेरले. फिटचा त्रास भस्म-चूर्ण यांनी बरा होतो, असे सांगत त्यांनी मुलीच्या आजारामुळे पिचलेल्या तिच्या नातेवाईकाला आपल्या जाळ्याच ओढले. ठाण्यात नेऊन त्याच्याकडून  नऊ लाख ४० हजार रुपये उकळण्याची तजवीजही केली.  मात्र बँकेतून पसे काढताना तिथल्या कर्मचाऱ्याने अशा उपचार पद्धतीवर शंका व्यक्त केल्यावर हा सर्व भंपकपणा आहे हे लक्षात आले.

चेंबूरमध्ये एका बँकेजवळ उभ्या असलेल्या ७९ वर्षांच्या आजोबांबरोबरच असाच प्रकार घडला.  तुमच्या सर्व व्याधी बऱ्या करण्यासाठी सुवर्णभस्माचा उपचार करावा लागेल असे सांगण्यात आले. त्यांनाही ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून एक लाख ६० हजार रुपयांचे सोने विकत घ्यायला लावले, त्यानंतर टोळक्याने पळ काढला तो कायमचाच.

या दोन्ही गुन्ह्य़ांमध्ये फसवणूक करणारी टोळी एकच  असून त्यांना नुकतीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष-२ ने जेरबंद केले. अजूनही या फसवणुकीच्या धंद्यात भागीदार असलेल्यांची धरपकड सुरू असून एक मोठे जाळेच पोलीस खोदून काढत आहेत. दुर्धर आजाराला वैतागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना गाठून त्यांना पर्यायी उपचार पद्धतीने आराम पडतो असे सांगत त्यांच्याकडून पसे उगाळणाऱ्या टोळ्या शहरात अनेक ठिकाणी कार्यरत असून डॉक्टर-रुग्ण-नातेवाईक यांच्यातील संवादाच्या अभावाचा फायदा उठवत फसवणुकीचा धंदा जोरात सुरू आहे. रुग्णालयांमध्ये दाखल असलेले रुग्ण आणि त्यांना हवे नको ते पाहण्यासाठी धावपळ करणारे त्यांचे नातेवाईक हे चित्र शहरभर दिसते. रुग्णालयांत आपले परिचित दाखल असताना, अनेकदा आपल्या रुग्णाच्या अवस्थेविषयी आजूबाजूच्या तसेच रुग्णालय परिसरात असलेल्या नागरिकांशी चर्चा-संवाद घडत असतो. याचाच फायदा घेऊन भामटे अशा अगतिक नातेवाईकांना भेटतात, त्यांना विश्वासात घेऊन आधुनिक वैद्यकशास्त्रापेक्षा पर्यायी उपचार पद्धतींनी हा आजार बरा होऊन असे िबबवण्यात येते. त्यासाठी वाट्टेल ती उदाहरणे देण्यात येतात. मग शहरातील एखाद्या अंतर्गत भागात किंवा शहराबाहेर असलेल्या तथाकथित दवाखान्यात नेऊन कधी भस्म-चूर्ण, औषधी देण्याच्या नावाखाली पसे उकळण्यास सुरुवात होते. उपचार मध्येच सोडले तर रुग्णाच्या जिवाला धोका पोहोचेल अशी भीतीही घालण्यात येते. अशा प्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

याविषयी रुग्ण हक्कांसाठी जागृती करणारे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार सांगतात की, उपचारांविषयी तसेच विविध वैद्यकशास्त्रांविषयी असलेली अपुरी माहिती यामुळे फसवणूकीचे प्रकार घडतात. एखाद्या रोगावर कोणता उपचार आहे, इतर वैद्यकशास्त्रत त्यावर काही उपाय आहे का, हे जोपर्यंत रुग्ण-नातेवाईकांना कळविले जात नाही तोपर्यंत रुग्णाचे नातेवाईक पर्यायी उपचार पद्धतींचा अवलंब करण्याची धडपड करतात. पर्यायी उपचार पद्धतींच्या वाटय़ाला जाण्याआधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे, असेही डॉ. दातार यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर-रुग्ण-नातेवाईक संवाद महत्त्वाचा

अनेकदा एखादा दुर्धर आजार झाला की, त्याविषयी जुजबी माहिती देऊन डॉक्टर निघून जातात. सार्वजनिक रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना याचा अनुभव बहुतेकदा येतो, याला रुग्णालयात रुग्णांची असलेली संख्याही कारणीभूत ठरते. पण, एखादा आजार झाल्यानंतर त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत, पर्यायी उपचार उपयुक्त ठरतील का, त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. पालिका रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता डॉक्टरांशी संपर्क साधावा. रुग्ण-नातेवाईकांना मार्गदर्शन-समुपदेशन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येण्याची गरज आहे.

– डॉ. अविनाश सुपे, संचालक, मुंबई महापालिका प्रमुख रुग्णालये

नागरिकांनी सतर्क राहावे

आपल्या नातेवाईकाला काहीही करून बरे वाटावे यासाठी रुग्णाचे नातेवाईक अगतिक झालेले असतात. त्याचाच फायदा या टोळ्या उचलतात. विविध माध्यमांतून आíथक शोषण करणाऱ्या टोळ्यांना बळी न पडता वेळीच सजग व्हावे, दुर्दैवाने फसवणूक झालीच तर तात्काळ पोलिसांना त्याची माहिती द्यावी.

– अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस सहआयुक्त (गुन्हे)