लोणावळा, खंडाळा, माथेरान आणि महाबळेश्वर या चार थंड हवेच्या ठिकाणी मे महिन्यात गर्दी अपेक्षित असतेच. मात्र, या आठवडय़ात शुक्रवारी महाराष्ट्र दिनापासून जोडून आलेल्या चार दिवसांच्या सुटय़ांतही या चारही ठिकाणांच्या हॉटेलचे दर शंभर टक्क्यांनी वाढले आहेत. तरीही येथील हॉटेल्सचे बुकिंग हाऊसफुल्ल झाल्याची माहिती पर्यटन संस्थांनी दिली आहे.
देशातील पर्यटकांच्या भूमिकेत अलीकडे बदल होत आहे. देशाच्या सुदूर स्थळी किंवा परदेशात पर्यटनासाठी जाणारे जसे आहेत तसेच छोटय़ा सुटीत जवळच्या पर्यटन स्थळी जाणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. याचाच फायदा घेत हॉटेल्सनी या आठवडय़ात आपले दर ६० ते ७० टक्क्यांनी वाढवले आहेत.
पर्यटकांना हॉटेलमधील वास्तव्य आवडू लागल्याचे ध्यानात घेऊन या उन्हाळी सुट्टय़ांसाठी हॉटेल्सनी आपापले दर वाढवले आहेत. देशभरातील पर्यटकांचा विचार केला तर त्यांचा कल हा मैसूर, उटी आणि कुर्ग येथे जाण्याकडे असतो. त्यामुळे तेथील हॉटेल्सनी आपले दर ६० ते ७० टक्क्यांनी तर मुंबईपासून जवळ असलेल्या लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान व कोकणातील हॉटेल्सनी आपले दर शंभर टक्क्यांनी वाढवले असल्याची माहिती ‘थॉमस कुक’च्या आयटी सव्‍‌र्हिस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मधान यांनी दिली.
हॉटेल्सच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा पर्यटकांवर तसूभरही परिणाम झालेला नाही. उलट, हॉटेल बुकिंगमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मधान यांनी सांगितले. १ मेची महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्यानंतर आलेला शनिवार-रविवार आणि सोमवारची बुद्धपौर्णिमेची सुट्टी अशा चार दिवसांच्या सुट्टय़ांमध्ये जवळपासचे थीम पार्क, तारापोरवाला मत्स्यालय, अलिबाग आणि जवळपासच्या रिसॉर्ट्सना भेटी देणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, इमॅजिकासारख्या थीम पार्कमध्ये थेट येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. या चार दिवसांच्या सुट्टीत इमॅजिकामध्ये २५ हजारच्या आसपास लोक अपेक्षित आहेत. थीम पार्क आणि अन्य ठिकाणच्या किमतीत मात्र वाढ झालेली नाही.
या चार दिवसांसाठी मोबाइलवर किंवा ऑनलाइन बुकिंग्जमध्ये चाळीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती ‘मेक माय ट्रीप’चे मुख्य व्यवसाय अधिकारी रणजीत ओक यांनी दिली.