सुहास जोशी

टाळेबंदीत सक्तीची घरकोंडी अनुभवलेल्या नागरिकांनी यंदाची दिवाळी सुट्टी पर्यटन मौजेसाठी राखून ठेवल्याचे दिसत असून गेल्या आठवडय़ापासून मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल्स पर्यटकांनी तुडुंब भरली आहेत. दोन-चार हजारांपासून हॉटेल-रिसॉर्टच्या अगदी महागडय़ा २० हजारांच्या आकर्षक सवलतींना दोन आठवडय़ांत जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता नवी नोंदणी करता येणे शक्य नसल्याचे व्यायसायिकांकडून सांगितले जाते.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत शहरातील गोंगाट आणि प्रदूषण यांना टाळण्यासाठी ही सुट्टी निसर्गरम्य वातावरणात घालविण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी दिवाळीत कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल साशंकता होती, मात्र दसऱ्यानंतर सारे चित्र बदलले. ऐन दिवाळीसाठीही बुकिंग झाले आहे. तसेच त्यानंतरच्या आठवडय़ासाठीही नोंदणी केली जात असल्याचे,’’ लोणावळ्याजवळील अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे राहुल जगताप यांनी सांगितले. सध्या दिवसाला चार हजार रुपयांपासून ते बारा ते २० हजार रुपये मोजण्याचीदेखील पर्यटकांची तयारी आहे. लोणावळ्याजवळील हिल्टन शिळिंम इस्टेट र्रिटीट अ‍ॅण्ड स्पा येथे १४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पर्यटकांसाठी राखण्यात आलेल्या सर्व व्हिला भरल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर दिसून येते.

रिसॉर्टमध्ये तुलनेने मोकळी जागा अधिक उपलब्ध असल्याने अंतरनियमांचे पालन करणे सहज शक्य आहे, असे खंडाळा येथील डय़ूक्स र्रिटीटचे व्यवस्थापक राकेश गुलेरिया यांनी नमूद केले.

अद्यापही अनेक रिसॉर्ट आणि हॉटेलना कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. टाळेबंदीत मूळ गावी गेलेले कर्मचारी अद्याप पूर्णपणे परतले नसल्याने पर्यटकांची संख्या वाढल्यास अडचणीचे ठरू शकत असल्याचे काही रिसॉर्टचालकांनी सांगितले.

‘टाळेबंदीच्या काळातील वीज देयकांचा घोळ, तसेच व्यवहार बंद असतानाच्या काळातील मद्यविक्री व अन्य परवान्यांसाठी वाढीव मुदत याबाबत शासनाकडून दिलासा मिळत नसल्याबद्दल,’ मुळशी येथील मल्हार माची आणि जलसृष्टी रिसॉर्टचे रामदास मुरकुटे यांनी नाराजी व्यक्त केली. टाळेबंदीत सर्वात आधी पर्यटन व्यवसाय बंद झाला आणि शिथिलीकरणात सर्वात शेवटी खुला करण्यात आला. मात्र शासनाने या क्षेत्राकडे सहानभूतीपूर्वक पाहिले नसल्याचे त्यांनी नमूद केले. दिवाळीनिमित्त अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद लाभत आहे, ही बाब सध्या समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

नजीकच जाण्याकडे कल..

ई-पासचे निर्बंध हटवण्याचा निर्णय आणि हॉटेल पूर्ण क्षमतेने चालविण्यास मुभा दिल्यानंतर या व्यवसायाला पुन्हा झळाळी आली. राज्यात अनेक मोठय़ा हॉटेल्स, रिसॉर्ट्सनी उत्तम दरांत आकर्षक सवलतींसह सुरक्षेची हमी दिल्यानंतर पर्यटकांची खास दिवाळीसाठी आगाऊ नोंदणी होऊ लागली. देशांतर्गत विमान आणि रेल्वे वाहतूक मर्यादित प्रमाणात सुरू झाली असली तरी त्यासाठी होणाऱ्या सोपस्कारात अधिक वेळ जात असल्याने शहरानजीकच्या रिसॉर्टला अधिक वाव मिळत आहे.

नोंदणीचित्र.. 

नाशिक परिसरात ‘वाइन पर्यटना’ची संकल्पना विकसित झाली आहे. दिवाळी आणि नंतरच्या आठवडय़ासाठी येथील सोमा वाइन व्हिलेज रिसॉर्टमध्ये सर्व उपलब्ध जागी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची बहुतांश रिसॉर्ट्स महिनाभरापूर्वी सुरू झाली असून, अनेक ठिकाणी दिवाळीसाठी बुकिंग वाढल्याचे महामंडळाच्या संकेतस्थळावर दिसून येते. माळशेज घाट, माथेरान, भंडारदरा या ठिकाणी मागणी अधिक आहे.