18 October 2018

News Flash

घरयोजनेला पालिकेच्या उदासीनतेचा फटका

म्हाडाकडून सतत पाठपुरावा सुरू असला तरी त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे कळते.

( संग्रहीत छायाचित्र )

 

११ गिरण्यांमधील ‘म्हाडा’चा वाटा अद्याप अनिश्चित!

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात सर्वाना मुंबईत घरे मिळू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ११ गिरण्यांमधील क्षेत्रफळाचा म्हाडाचा वाटा केवळ महापालिकेच्या उदासीनतेमुळे अद्यापही निश्चित होऊ शकलेला नाही. त्यामुळे भविष्यात मुंबईत गिरणी कामगारांसाठी किती घरे उभारता येतील, याबाबत म्हाडा संदिग्ध आहे. याबाबत म्हाडाकडून सतत पाठपुरावा सुरू असला तरी त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे कळते.

गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावीत, यासाठी आग्रही असलेल्या ‘गिरणी कामगार संघर्ष कृती समिती’ने याबाबत वारंवार आंदोलने केली, परंतु त्यांचे म्हणणे ऐकण्यासही शासन तयार नाही. मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागूनही मिळत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. गिरणी कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात १९ गिरण्यांमधील भूखंडावर ६९२५ सदनिकांची सोडत २०१२ मध्ये काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात २०१६ मध्ये सहा गिरण्यांमधील भूखंडावरील २६३४ सदनिकांची सोडत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आली. यामध्ये भारत (१८८), वेस्टर्न इंडिया (२५०), सेंच्युरी (१४३०), प्रकाश कॉटन (५६२), रुबी (४७), स्वान (१५७) या गिरण्यांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत ५८ गिरण्या असून त्यापैकी ११ गिरण्यांमधील म्हाडाचा वाटा अद्याप निश्चित झालेला नाही. उर्वरित ४७ पैकी दहा गिरण्यांमध्ये म्हाडाच्या वाटय़ाला काहीही आलेले नाही. श्रीनिवास मिल, इंडिया युनायटेड मिल नं. ४, जाम, मधुसूदन, सीताराम आदी पाच गिरण्यांचा ताबा मिळालेला नाही तर मातुल्य, मफतलाल मिल क्र. ३, हिंदुस्तान मिल युनिट १ व २, वेस्टर्न इंडिया मिल, हिंदुस्तान मिल युनिट नं. ३ व व्हिक्टोरिया या सहा गिरण्यांचे भूखंड लहान आहेत. या भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार ८७३ चौरस मीटर असून त्याऐवजी महापालिकेस प्राप्त होणाऱ्या मोकळ्या मैदानाच्या भूखंडाबरोबर तेवढय़ाच आकाराचा भूखंड अदलाबदल करून मिळावा, असा प्रस्ताव म्हाडाने पाठविला आहे. तोही प्रस्ताव पालिकेकडे प्रलंबित आहे.  पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गिरणी कामगारांची घरयोजना पुढे सरकू शकलेली नाही.

म्हाडाचा वाटा निश्चित न झालेल्या गिरण्या

  • दिग्विजय
  • फिनले
  • गोल्डमोहोर
  • इंडिया युनायटेड मिल नं. १, ५, ६
  • न्यू सिटी मिल
  • पोद्दार प्रोसेसर (एडवर्ड मिल)
  • टाटा मिल (सर्व राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या अखत्यारित)
  • ब्रॅडबरी मिल
  • न्यू ग्रेट इस्टर्न मिल
  • रघुवंशी मिल

First Published on December 8, 2017 4:32 am

Web Title: house plan bmc mill workers houses mhada