गुन्हेगार अद्याप मोकाट; पोलिसांकडून केवळ तपास सुरू
कांजूर येथील अशोक नगर आणि भांडुप येथील कोकणनगर परिसरात झालेल्या घरफोडय़ांमधील गुन्हेगारांचा माग काढण्यात मुंबई पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे या घरफोडय़ा करणारी टोळी पुन्हा एकदा उपद्रव करण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन्ही ठिकाणच्या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी ‘तपास सुरू आहे’ एवढेच उत्तर देत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
कांजूरमधील अशोक नगर भागात विविध चाळीतील १५ घरे ७ मे रोजी पहाटेच्या दरम्यान कडीकोयंडे तोडून फोडण्यात आली. यातील १० घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला तर ५ घरातून एकूण पाच लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. घरातील लोक सुट्टीच्या निमित्ताने गावाला गेल्याची संधी साधून चोरांनी या घरफोडय़ा केल्या. यावेळी अंगुली मुद्रा पथकाने घटनास्थळी हातांचे ठसे घेतले. तसेच श्वानाची मदतही घेण्यात आली. मात्र, चोरटय़ांनी हाताळलेल्या वस्तूंनी श्वान संभ्रमित झाल्याने चोरांचा शोध लागला नाही. घरफोडय़ा झाल्या त्या रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अशोक नगरच्या पाठीमागे असलेल्या परांजपे हॉल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक तरुण तोंडावर रुमाल बांधून चालत जात असल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले, पण त्यावरून संशयित आरोपीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पोलिसांनी जुन्या नोंदीतील तसेच संशयित गुन्हेगारांचीही चौकशी सुरू केली आहे. मात्र, तपासकामात फारशी प्रगती झालेली नाही.
कांजूरपाठोपाठ भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ मे च्या पहाटे चोरांनी धुमाकूळ घालून येथे नऊ घरे फोडली. या ठिकाणीही घरातील कुटुंब गावी गेल्याचा फायदा घेऊन घरफोडी करण्यात आली.

शास्त्रीनगर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर चित्रित झाले असून त्याच्या आधारे भांडुप पोलीस चोरटय़ांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही. कांजूर आणि भांडुप परिसरात झालेल्या घरफोडय़ांमध्ये गुन्हेगारांनी कडीकोयंडे तोडण्याची एकच चोरीची शैली वापरल्याचे दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमागे एकाच टोळीचा हात असावा, असा पोलिसांचा कयास आहे.