कल्याण शहरात घरफोडी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला महात्मा फुले चौक पोलिसांनी सोमवारी अटक केली असून त्यांच्याकडून पाच किलो चांदीचे दागिने, गॅस कटर्स आणि सहा सिलिंडर, असा ऐवज जप्त केला आहे. गॅस कटरच्या साहाय्याने घरफोडय़ा करण्याची या टोळीची कार्यपद्धत आहे. तसेच या टोळीने राज्यासह इतर राज्यांमध्येही घरफोडींचे गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
अख्तार रजाकअली शेख (२५), अब्दुल करीम ऊर्फ छोटा बटला सत्तर अबू तालेम शेख (३६) आणि जियाहुल आपुसे शेख (२३) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते मूळचे झारखंड येथील साहेबगंजचे रहिवासी आहेत. सध्या हे तिघे मुंबई तसेच कल्याण परिसरात राहत होते. तसेच तिघेही नारळविक्रीचा फिरता व्यवसाय करतात. त्यातूनच ते घरफोडय़ा करण्यासाठी सावज हेरायचे आणि त्या ठिकाणी गॅस कटरच्या साहाय्याने घरफोडी करायचे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी दिली.
कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील संघवी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत तोडून सोन्या-चांदीचा ऐवज त्यांनी लुटला होता. त्या वेळी मुख्य तिजोरी गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न फसला होता.या प्रकरणाचा तपास करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तिघांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. यातील अख्तार शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो चेन्नई येथील कारागृहात दोन वर्षे बंद होता, अशी माहितीही त्यांनी दिली. या तिघांना १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.