मुंबई महानगरात गेल्या सहा महिन्यांत नवीन गृहप्रकल्पांमुळे उपलब्ध घरांच्या संख्येत वाढ झाली असली तरी विक्रीत मात्र घट झाल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पातही कमालीची वाढ झाली असली तरी या घरांनाही मागणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांतील मुंबई महानगर परिसरातील घर खरेदी-विक्रीचा अहवाल ‘नाईट फ्रँक‘ने जाहीर केला आहे. या अहवालानुसार महानगरात ७९ हजार ८१० घरे नव्याने विक्रीसाठी उपलब्ध झाली. या काळात फक्त ३५ हजार ९८८ घरांची विक्री झाली. मुंबई महानगरात काही बडय़ा विकासकांनी गृहप्रकल्पांची घोषणा केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत उपलब्ध घरांच्या संख्येत ३६ टक्के वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. मात्र त्याचवेळी महानगरातील घरांची विक्री चांगलीच रोडावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १४ टक्के घट झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महानगरातील न विकल्या गेलेल्या घरांची संख्या एक लाख ४५ हजार ३०१ इतकी असल्याचेही या अहवालात उल्लेख आढळतो.

नाईट फ्रँकचे कार्यकारी संचालक गुलाम झिया यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षांतील मंदीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीवरही परिणाम झाला. मात्र ही परिस्थिती पुढील सहा महिन्यांत बदलेल, अशी आशा आहे. केंद्र सरकारने घेतेलल्या काही निर्णयांचा दृश्य परिणाम बांधकाम उद्योगावरही दिसेल.