राहुल गांधी यांची घोषणा; मुंबईतील जाहीर सभेत मोदींवर हल्लाबोल

मुंबई : केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मुंबईतील झोपडपट्टीधारक, चाळीतील रहिवाशी यांना पुनर्विकास योजनेत ५०० चौरस फुटांची घरे देण्याचा दहा दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी विराट सभेत केली.

वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावरील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमीप्रमाणे घणाघाती हल्ला चढविला. मोदी चोरच नाही तर घाबरटही आहेत, हिंमत असेल तर, त्यांनी भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी पुढे यावे, असे आव्हान राहुल यांनी त्यांना दिले.

मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या निमित्ताने काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, मिलिंद देवरा, वर्षां गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, हुसेन दलवाई, नसिम खान यांची भाषणे झाली. व्यासपीठावर  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह, भाई जगताप, चरणसिंह सप्रा आदी पक्षाचे आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधी भाषणाला उभे राहताच उपस्थिीत गर्दीतून मोदींच्या नावाने ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली. राहुल यांनी मोदी यांच्या कार्यपद्धदीवर टीकीची झोड उठविली. मोदी फक्त अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, निरव मोदी यांसारख्या देशातील पंधरा बडय़ा लोकांसाठी काम करतात, खोटय़ा घोषणा करतात, अशी टीका त्यांनी केली.

ज्यांना खोटे ऐकायचे त्यांनी तिकडे म्हणजे भाजप किंवा मोदीकडे जावे, ज्यांना खरे ऐकायचे आहे, त्यांनी काँग्रेसकडे यावे, ज्यांना मन की बात ऐकायची आहे, त्यांनी तिकडे जावे, ज्यांना काम की बात ऐकायची यानी इकडे म्हणजे काँग्रेसकडे यावे, असे आवाहन करतानाचा मोदींच्या मन की बात सारख्या सवंग घोषणांची त्यांनी खिल्ली उडविली.

काळा पैसा, नोटा बंदी, जीएसटी यावरुनही राहुल गांधी यांनी मोदी यांच्या गरीब, मध्यमवर्गीय, लहान व्यवसायिक यांच्याविरोधी धोरणांचा समाचार घेतला. नोटाबंदी करुन सर्व समान्यांना बँकांच्या दारात रांगा लावायला लावल्या, त्यात अनिल अंबानी, चोक्सी, निरव मोदी दिसले का, असा सवाल त्यांनी केला. हे लोक बॅंकेत मागच्या दाराने गेले आणि त्यांचा काळा पैसा सफेद करुन घेतला, असा आरोप त्यांनी केला.

काही ठराविक श्रीमंत लोकांना जमीन, वीज, पाणी पाहिजे तेव्हा दिले जात आहे,  या देशातील शेतकरी मात्र आत्महत्या करीत आहेत. मोदींनी दोन भारत तयार केले आहेत, एक अनिल अंबानी, चोक्सी, नीरव मोदी अशा बडय़ा लोकांचा आणि दुसरा भारत आहे, शेतकरी, कष्टकरी, लहान व्यापारी यांचा. अशा लहान वर्गावर जीएसटी सारखा गब्बरसिंग कर लाऊन त्यांची लुबाडणूक केली जात आहे, असे ते म्हणाले.

संसदते राफेलवर  दीड तास भाषण केले, परंतु मी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. भारतीयांच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची त्यांची हिंमत नाही. भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पुढे यावे असे आव्हान राहुल यांनी  मोदी यांना दिले.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मुंबईचा आणि धारावीचा आवर्जून उल्लेख केला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सध्या २५० चौरस फुटांचे घर दिले जाते, परंतु केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर फक्त दहा दिवसांत झोपडपट्टी, चाळीतील रहिवाशांना पुनर्विकास योजनेत ५०० चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

आगामी निवडणुकीत वैचारिक लढाई होणार आहे, मोदींच्या काळात संविधानावर हल्ले झाले आहेत, संविधान देशाचा आवाज आहे ते वाचविण्याची लढाई करायची आहे,  या लढाईत जे बरोबर येतील त्यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत, अशी साद त्यांनी समविचारी पक्षांना घातली. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे यांना उद्देशून त्यांचे हे  सूचक वक्तव्य होते, अशी नंतर चर्चा सुरु झाली.

पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी, चोक्सी, नीरव मोदी अशा बडय़ा दहा-पंधरा लोकांचे साडे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आणि संसदेत टाळ्या घेऊन शेतकऱ्यांना किती मदत  देण्याची घोषणा केली तर  एका कुटुंबाला १७ रुपये आणि एका व्यक्तीला केवळ साडे तीन रुपये. हिंदुस्थान एरोनॅटिक्सचे कंत्राट अनिल अंबानींना देऊन तीन हजार कोटी रुपये त्यांच्या खिशात मोदींनी घातले.