म्हाडामध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा असल्याची तक्रार आल्यामुळे अखेरीस राज्याच्या गृहनिर्माण विभागाने या बदल्यांचा वर्षभरातील तपशील मागविला आहे. साधारणत: मे किंवा जून महिन्यांत एकत्रित बदल्या करण्याची पद्धत आहे. परंतु गेल्या वर्षभरात अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना एकेक अधिकाऱ्याचे स्वतंत्र आदेश काढण्यात आले. हे आदेश काढताना मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार आल्यामुळेच गृहनिर्माण विभागाने ही माहिती मागविली आहे.

म्हाडातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत लागू असलेला कायदा २००५ नुसार, सर्वसाधारण बदल्या आणि नियुक्त्या या मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात करण्यात येतात. परंतु उपमुख्य अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी २६ एप्रिल रोजी तातडीने समितीची बैठक बोलाविण्यात आली आणि २७ एप्रिल रोजी तात्काळ इतिवृत्त मान्य करून लगेच संबंधित उपमुख्य अभियंत्याच्या नियुक्तीचे आदेशही जारी करण्यात आले. त्याच वेळी भ्रष्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेशही काढण्यात आले. झोपु प्राधिकरणातील ‘श्रीमंत’ अभियंते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कार्यकारी अभियंत्याची म्हाडाचे उपमुख्य अभियंते म्हणून नियुक्ती करण्यात आली, अशी तक्रार गृहनिर्माण विभागाकडे करण्यात आली होती.

कनिष्ठ अभियंता ते उपअभियंता या अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर लगेचच आठवडाभरात सुधारित आदेश जारी करण्यात आले. काही अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यात आल्या आणि पुन्हा त्याच ठिकाणी किंवा मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या. त्याच वेळी लिपिकांच्या बढती व बदल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. अखेर १०५ कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांच्या बढती आणि बदल्या करण्यात आल्या. याबाबत अनेक तक्रारी झाल्यामुळे आता गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी या बदल्यांचा तपशील मागविला आहे, असे सूत्रांनी सांगितले.