सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ हे पहिल्या फळीतील नेते गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांनी चर्चेत राहिले वा त्यांच्यावर आरोप झाले. यापैकी छगन भुजबळ मात्र नेहमीच अडचणीत आले आहेत. भुजबळच का अडचणीत येतात, असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो.
अशोक चव्हाण यांना ‘आदर्श’ घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला. राणे यांच्यावर विविध आरोप झाले. शिंदे यांच्यावर ‘आदर्श’मध्ये आरोप झाले. गेल्या दहा वर्षांमध्ये छगन भुजबळ हे दुसऱ्यांदा चांगलेच अडचणीत आले आहेत. तेलगी घोटाळ्याशी भुजबळ यांचे नाव जोडले गेले होते. विशेष चौकशी पथकाने भुजबळ यांना घाम फोडला होता. तेलगी घोटाळ्यात काही बडी नावे पुढे येऊ लागताच त्याचा तपास थंड बस्त्यात गेला. त्यातून भुजबळ सुदैवाने बचावले, पण महाराष्ट्र सदन आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागले.
भुजबळ यांच्या निकटचे त्यांच्यापासून दुरावले. त्यांनी सारी माहिती इतरांना पुरविली. यामुळेच भुजबळांची सारी थक्क करणारी संपत्ती उघड झाली. गृहमंत्री आणि बांधकाममंत्री ही दोन्ही खाती भूषविताना भुजबळ अडचणीत आले. शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यापासून साऱ्याच बडय़ा नेत्यांच्या विरोधात विविध आरोप झाले. आरोप करणाऱ्यांना त्यांच्या विरोधातील पुरावे सादर करता आले नाहीत. भुजबळ यांच्या मालमत्तेची सारी माहिती बाहेर आली व त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली, असे एका बडय़ा राजकीय नेत्याने सांगितले. साऱ्याच नेत्यांनी मोठय़ा प्रमाणावर मालमत्ता केली आहे वा गुंतवणूक केली आहे, पण कोणाचीच इत्यंभूत माहिती कधीही उघड झाली नाही.