14 December 2019

News Flash

मालेगाव बॉम्बस्फोट खटला कधीपर्यंत संपणार?

उच्च न्यायालयाची ‘एनआयए’ला विचारणा

(संग्रहित छायाचित्र)

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला कधीपर्यंत संपणार? असा सवाल उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केला. तसेच दोन आठवडय़ांत त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही तपास यंत्रणेला दिले.

खटल्याच्या सुनावणीचे चित्रीकरण केले जावे आणि खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याची मागणी खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णी याने याचिकेद्वारे केली आहे. त्याच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने खटला कधीपर्यंत संपणार, अशी विचारणा करत ते स्पष्ट करण्याचे आदेश ‘एनआयए’ला दिले. त्याआधी ४७५ पैकी १२४ सरकारी पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आल्याची माहिती ‘एनआयए’चे वकील संदेश पाटील यांनी दिली.  दरम्यान, खटल्यातील ज्या साक्षीदारांच्या नावांबाबत आणि जबाबांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे, अशा साक्षीदारांच्या नावांची यादी सादर करण्यास ‘एनआयए’तर्फे मुदतवाढ मागण्यात आली.

खटल्यातील ज्या साक्षीदारांची नावे आणि जबाब आरोपपत्रात गोपनीय म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत, त्या साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती कुठलीही गोपनीयता न बाळगता उपलब्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहित याने याचिकेद्वार केली आहे. न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेची दखल घेत खटल्यातील ज्या साक्षीदारांच्या नावांबाबत आणि जबाबांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे, अशा साक्षीदारांच्या नावांची यादी सादर करण्याचे आदेश मागील सुनावणीच्या वेळी ‘एनआयए’ला दिले होते.

First Published on July 23, 2019 1:43 am

Web Title: how long will the malegaon bombing case end abn 97
Just Now!
X