News Flash

“अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार उद्धवजी?”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल; शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून भाजपा पुन्हा आक्रमक!

संग्रहीत छायाचित्र

पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून भाजपा आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्य्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जोरदार टीका केली आहे. तसेच, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील शरजील उस्मानीला महाविकासआघाडी सरकार आपल्या छायाछत्राखाली घेऊन विशेष वागणूक देत आहे, असा आरोप केला आहे. तसेच, “पाताळातूनही शरजील उस्मानीला खेचून आणू, अशी गर्जना करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अग्रलेखातून हिंदुत्वाच्या डरकाळ्या फोडणारे खासदार संजय राऊत आता का गप्प आहेत?” असा सवालही त्यांनी केला आहे.

या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विटद्वारे म्हणतात, “आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शरजील उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला आणि महाविकासआघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले? मूळ तक्रारीत भादंविचे २९५ अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम १५३ अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.”

तसेच, “खरे तर एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार उद्धवजी?” असा सवाल देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेला आहे.

शरजील उस्मानीला महाविकासआघाडी सरकारकडून विशेष वागणूक – केशव उपाध्ये
याचबरोबर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या मुद्यावरून महाविकासआघाडी सरकारवर आरोप केला आहे. “एल्गार परिषदेमध्ये ‘हिंदू सडा हूआ है’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या शरजील उस्मानीलाही आता हे महाविकासआघाडी सरकार आपल्या छायाछत्राखाली घेऊन विशेष वागणूक देत आहे, अशी टीका करत, शरजील उस्मानीचे हे वक्तव्य गंभीर स्वरूपातील असूनही कठोर कलमाखाली का गुन्हा दाखल केला जात नाही?” असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी उपाध्ये म्हणाले, “सत्तेत आल्यापासून सर्व प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना संरक्षण द्यायची हीच या सरकारची भूमिका राहिल्याचे वारंवार पाहायला मिळते आहे. त्यामुळेच शरजील उस्मानीने तपासात सहकार्य केल्यास कठोर कारवाई करणार नाही, असे स्पष्ट आश्वासन पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिले आहे. शरजील उस्मानीच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने स्वतः हुन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने उस्मानीवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची हिंमत दाखविली नाही. भाजपा युवा मोर्चाने आंदोलन केल्यावर उस्मानी विरोधात एफआयआर दाखल केला गेला. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भादंवि नुसार २९५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मात्र, त्याच्या विरुद्ध केवळ सामाजिक भावना दुखावल्या या संदर्भातील १५३ (अ) चे सौम्य कलम लावले. उस्मानीने त्याच्या भाषणात घटनेचाही अवमान केला आहे. कायद्यानुसार अशा कृत्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाणे अपेक्षित होते. मात्र, महाविकासआघाडी सरकारने राज्यघटनेचा अपमान ही मुकाट गिळला आहे.”

मुख्यमंत्री ठाकरे, संजय राऊत आता गप्प का? –
तसेच, “विधीमंडळ अधिवेशनात ‘पाताळातूनही शरजील उस्मानीला खेचून आणू, अशी गर्जना करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘सामना’ अग्रलेखातून हिंदुत्वाच्या डरकाळ्या फोडणारे खासदार संजय राऊत आता का गप्प आहेत? तपासात पोलिसांना सहकार्य करणाऱ्या अशा किती गुन्हेगारांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे? हेही सरकारने स्पष्ट करावे.” असं बोलत केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर यावेळी निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 4:52 pm

Web Title: how many more people will be saved for power uddhavji devendra fadnavis msr 87
Next Stories
1 मुंबईतील घटना : मैत्री तोडली म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; तरुणाने घेतलं विष
2 अंबानी स्फोटकं प्रकरण : सीसीटीव्ही, डीव्हीआर सचिन वाझेंच्या सहकाऱ्यांनी नेले
3 महाविद्यालयांतील प्रवेशांत घट
Just Now!
X