अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच जबाबदार कसे नाही, असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केला आहे. मुंबईमधील अंधेरीतील गोखले पूल मंगळवारी सकाळच्या सुमारास कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी पुलाखालून लोकल जात नसल्याचे मोठी हानी झाली नाही. पण ५ जण जखमी झाले होते. पूल कोसळल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने लगेचच हा पूल रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याचे जाहीर करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. तर रेल्वेनेही सुरूवातीला याची जबाबदारी घेतली नव्हती. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच जबाबदार कसे नाही, असा सवाल करत महापालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरले जात नाही, असा जाब विचारला.

एलफिन्स्टन रेल्वेच्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात स्मिता ध्रुव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अंधेरी पूल दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करत, महापालिकेला धारेवर धरले. न्यायालयाने रेल्वे प्रशासनालाही खडे बोल सुनावले. रेल्वे ही काही परदेशी संस्था नाही. या ठिकाणी हद्दीचा मुद्दा उपस्थितच का होतो, असा सवाल रेल्वेला केला.

 

दि. १२ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता आणि केंद्र सरकारच्या मुख्य वकिलांनी हजर राहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले.