पंचवीस वर्षांपासून सरकारी तुरुंगवासात अडकलेल्या प्रभू रामाला बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाण्याची घोषणा केली. मात्र, इतके दिवस शांत बसलेल्या भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांना आताच कशी जाग आली. अयोध्येत जाण्यासाठी २५ तारखेचाच मुहूर्त त्यांना कसा मिळाला?, असा खडा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, २५ वर्षांपूर्वी बाबरी मशीदीचा कलंक कायमचा पुसण्यासठी शेवटी शिवसेनेनेलाच हिंदुत्वाची वज्रमुठ आवळावी लागली. अद्यापपर्यंत राम मंदिराचे विस्मरण झालेल्या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिराच्या उभारण्यासाठी अयोध्येत ‘हुंकार रॅली’साठी २५ नोव्हेंबर तारीख निश्चित केली आहे. हिंदुत्वाचा एल्गार शिवसेनाप्रमुखांनी पेटवला होता. त्यामुळे आजचा हुंकार हा बाळासाहेबांच्या एल्गाराचाच भाग अहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, सभा, संमेलने भरवून राजकीय हुंकार भरवण्यात रसही नाही. मात्र, २५ नोव्हेंबरला जर अयोध्येत क्रांतीच्या ज्वाला पेटणार असतील तर आम्ही कोणताही मुहूर्त न पाहत या उपक्रमात सहभागी होऊ. शिवसेनेने अयोध्येला जाऊ नये यासाठी आता खोडा घालण्याचे काम सुरु आहे. आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा केली तेव्हापासून अनेकांचे कोमजलेले मेंदू हालचाल करु लागले आहेत. हा शिवसेनेच्या भुमिकेचा विजय आहे.

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी कोणी कितीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेच्या वारीत बदल होणार नाही, असे शिवसेनेकडून आपल्या मुखपत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. अशा बालिश खेळ्या करुन ना हिंदूत्व मजबूत होईल ना राम मंदिराचा प्रश्न निकाली निघेल. लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने सगळ्यांनी मिळून राम मंदिर उभारावे. मात्र, त्याची २५ तारखीच सुचवणाऱ्याचे नाव समोर आणावे, असे आव्हानही शिवसेनेने संघ परिवाराला दिले आहे.