करोनावर लस येणार येणार असं म्हटलं जात आहे. मात्र, अद्याप ती आलेली नाही. त्यामुळे लस आल्यानंतरही ती कशी द्यायची हे अद्याप अधांतरीच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, हात धुणे, अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर करा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “आज सुद्धा लस हाताशी आलेली नाही. काल परवा मी यासंदर्भात काही जणांशी बोललो तर ते लस येते आहे असं म्हणत आहेत पण ती अजून हातात आलेली नाही. समजा ही लस डिसेंबरमध्ये आली तर महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेला ही लस द्यावी लागणार आहे. पण ही लस बनवणाऱ्या ज्या दोन-चार कंपन्या आहेत. त्यांच्याकडून पहिला डोस त्यानंतर बुस्टर डोस द्यावे लागणार आहेत. म्हणजेच साडेबारा दुणे पंचवीस अशा पंचवीस कोटी जनतेला ही लस द्यावी लागणार आहे. अशा प्रकारे पहिल्या डोसपासून शेवटच्या डोसपर्यंत किती काळ जाईल, हे अद्याप सांगता येणार नाही.”

तसेच ही लस कशी, कोणत्या स्वरुपात मिळणार आहे. तिला कोणत्या तापमानात ठेवावं लागणार आहे, कशी द्यायची ही लस हे सगळं अजूनही अधांतरी आहे. अद्याप लशीबाबत काहीही हातामध्ये नाही. यावर औषधे तर नाहीच पण लस सुद्धा अजून हातात आलेली नाही. म्हणूनच मास्क लावणे, हात धुणे आणि एकमेकांपासून अंतर पाळणे ही त्रुसु्त्री पाळणे गरजेचे आहे, असं पुन्हा एकदा आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे.