आधुनिक जीवनशैलीत शीतकपाट म्हणजेच रेफ्रिजरेटरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाजीपाला, फळे यांसह खाद्यपदार्थ ताजे राहावे, उकाडय़ाच्या दिवसांत थंड पाणी मिळावे यासाठी रेफ्रिजरेटरचा उपयोग केला जात असला तरी त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. हिवाळय़ात बाहेरील तापमान थंड राहत असल्याने रेफ्रिजरेटरची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे.

  • रेफ्रिजरेटरची आणि त्यामधील फ्रिजरची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. फ्रिजरची साफसफाई करण्याचा सवरेत्कृष्ट काळ म्हणजे हिवाळा. हिवाळय़ात वातावरणातील तापमान कमी असल्याने फ्रिजरमध्ये आपण जे सामान ठेवतो, ते बाहेर काढून ठेवले तरी ते खराब होणार नाही. फ्रिजरची साफसफाई करण्यापूर्वी त्यामधील सर्व सामान म्हणजे बर्फ तयार करण्याचे भांडे, आइस्क्रीमचे भांडे बाहेर काढून ठेवावे.
  • हिवाळय़ात फ्रिजरमध्ये बर्फ अधिक साचतो. कधी कधी फ्रिजरच्या खालील बाजूसही बर्फ साचतो. या अधिक बर्फामुळे फ्रिजरमध्ये पदार्थ ठेवण्यास कठीण जाते. त्यामुळे हा बर्फ वितळवणे गरजेचे आहे. हा बर्फ चाकू किंवा टोकदार वस्तूने काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे फ्रिजर खराब होऊ शकतो.
  • रेफ्रिजरेटरचा विद्युतपुरवठा २४ तासांसाठी खंडित करावा. या काळात रेफ्रिजरेटरमध्ये साचलेला बर्फ वितळून जाईल. या वेळेत रेफ्रिजरेटरची साफसफाईही करता येईल. मात्र तत्पूर्वी रेफ्रिजरेटरमधील सर्व खाद्यपदार्थ, भाजीपाला बाहेर काढून ठेवणे आवश्यक आहे.
  • हिवाळय़ात शक्यतो रेफ्रिजरेटरचे तापमान कमी ठेवावे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये तापमान कमी-अधिक करण्याची सुविधा असते.
  • रेफ्रिजरेटरच्या मागच्या बाजूस असलेल्या भांडय़ात (ड्रिप पॅन) हिवाळय़ामध्ये पाणी साचते. बाहेरील तापमान थंड असल्याने या पाण्याची वाफ होत नाही. हे पाणी साचून राहिल्याने काही दिवसांनी रेफ्रिजरेटरच्या मागून दरुगधी येते. त्यामुळे हे भांडे साफ करणे आवश्यक आहे. रेफ्रिजरेटर बंद करून हे भांडे काढावे. त्यातील साचलेले पाणी फेकून देऊन ते साफ करावे.